खळबळजनक! बंद पडलेल्या कंपनीत आढळला शिर धडावेगळे केलेला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2023 14:41 IST2023-01-15T14:40:30+5:302023-01-15T14:41:40+5:30
धारदार शस्त्राने शिर धडा वेगळे करून अनोळखी तरुणाचा खूनाची वाळूज उद्योग नगरीतील थरारक घटना

खळबळजनक! बंद पडलेल्या कंपनीत आढळला शिर धडावेगळे केलेला मृतदेह
वाळूजमहानगर : एक २० ते २५ वर्षीय अनोळखी तरुणाचे मशिर धडावेगळे करून निर्घृणपणे खून केल्याची घटना आज रविवार (दि.१५) सकाळी १० वाजेच्या सुमारास वाळूज उद्योगनगरीतील फतेजा फोर्जींग या बंद पडलेल्या कंपनीत उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाळूज उद्योगनगरीतील फतेजा फोर्जींग या बंद पडलेल्या कंपनीत एका अनोळखी तरुणांचे मुंडके धडा वेगळे करून खून केल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, दुय्यम निरीक्षक गणेश ताठे, सहाय्यक निरीक्षक मदनसिंग घुनावत, उपनिरीक्षक सचिन शिंदे, चेतन ओगले, पोका अविनाश ढगे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. फतेजा कंपनीच्या पाठीमागे खोल खड्यात त्या तरुणाचा मृतदेह वाळलेल्या झाडाच्या फांद्यात झाकून ठेवलेला होता. फांद्या हटविण्यात आल्यानंतर त्या तरुणाचे शिर धडा वेगळे केलेले दिसून आले.
मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
अज्ञात मारेकऱ्यांने धारदार शास्त्रणे खून केल्यानंतर त्या तरुणाचे शिर धडावेगळे करुन मुंडके व मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलिसांना कुठलाही पुरावा मिळाला नसून या तरुणाचा खून केल्यानंतर रात्रीच्या वेळी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या अनोळखी तरुणांच्या उजव्या हातावर छत्रपती असे नाव गोंदलेले असून डाव्या हाताच्या बोटात तीन अंगट्या आहेत. या खुनाच्या घटनेनंतर घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब पथकाने रक्ताचे व मातीचे नमुने तपासणी साठी घेतले असून मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले आहे. मयत अनोळखी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे.