छत्रपती संभाजीनगर : मुस्लीम, ख्रिश्चन, शीख धर्मांत विधी, पूजापाठाचा सारखेपणा आहे; पण, बौद्ध धम्मात तो दिसत नाही. त्यामुळे देशभरात बौद्ध धम्मातील पूजापाठ, विधीमध्ये किमान समान कार्यक्रम असावा, यासाठी मोहीम राबविण्याची गरज आहे, अशी अपेक्षा प्राचार्य डॉ. एम. ए. वाहुळ यांनी व्यक्त केली.
बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित ‘बुद्धविहारांच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशना’ची रविवारी सांगता झाली. या दोनदिवसीय अधिवेशनासाठी २२ राज्यांतील बौद्ध अनुयायी उपस्थित होते. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. ए. वाहुळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन, चरित्र व साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, हॅप्पी सायन्स, साउथ आशिया खंडाचे प्रमुख कोटा नोगुची (जपान), भदंत डॉ. चंद्रबोधी, डॉ. सय्यद रफिक, पारनेर, बहुजन संघटनचे प्रमुख राहुल खांडेकर, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, चेतन कांबळे, सुनील वाकेकर, ॲड. एस. आर. बोदडे, आदींची उपस्थित होती.
यावेळी डॉ. वाहुळ म्हणाले, आज आम्ही शिकलो, मोठमोठ्या पदांवर नोकऱ्या मिळाल्या, मानसन्मान, स्वाभिमान मिळाला, तो केवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक संघर्षामुळेच. पण, आपल्यातीलच नरेंद्र जाधवांसारखी मंडळी बाबासाहेबांविषयी चुकीची मांडणी करत विद्वत्ता पाजळण्याचा प्रयत्न करीत आहेत, ही बाब केविलवाणी आहे. आपण आपली संस्कृती निर्माण करण्यासाठी, सामाजिक बदलासाठी व्यापक पातळीवर काम करण्याची गरज असून उशिराने का होईना, त्याची सुरुवात बुद्धविहार समन्वय समितीने केली, ही गौरवास्पद बाब आहे.
याप्रसंगी कोटा नोगुची (जपान) म्हणाले, बौद्ध संस्कृती निर्माण करण्यामध्ये बुद्धविहारांची महत्त्वाची भूमिका आहे. भारतातील बुद्धविहारांच्या समन्वयाबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुद्धविहारांमध्येही समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जेणेकरून जगभरामध्ये बौद्ध संस्कृती रुजविण्यामध्ये आपण महत्त्वाचा वाटा उचलू शकू. डॉ. सय्यद रफिक म्हणाले की, बौद्ध धम्म आणि मुस्लिम धर्माच्या शिकवणीमध्ये साम्य आहे. त्यामुळे बुद्धविहार आणि मशीद यांच्यात समन्वय घडवून आणण्याची गरज आहे. यासाठी येत्या काळात आपण प्रयत्न करणार आहोत. अशोक सरस्वती बौद्ध यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भारत सिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. अमरदीप वानखडे यांनी आभार मानले.