सिल्लोड : परीक्षा केंद्रावर बंदोबस्त बजावून घरी परत येत असताना दुचाकीला पाठीमागून भरघाव बसने जोराची घडक दिल्याने होमगार्ड जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी (दि. २७) दुपारी साडे तीनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील बनकिन्होळा गावाजवळील वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. भगवान येडुबा फरकाडे (५६, रा. बनकिन्होळा, ता. सिल्लोड) असे मृताचे नाव असून ते वडोदबाजार पोलिस ठाण्यात होमगार्ड पदावर कार्यरत होते.
मृत होमगार्ड भगवान फरकाडे निधोना (ता. फुंलब्री) येथील एका शाळेवर परीक्षेचा बंदोबस्त बजावून दुचाकीवरुन (एमएच- २८, जी- ९८३५) गावी परत येत होते. बनकिन्होळा गावाजवळ येताच पाठीमागून येणाऱ्या पुणे- रावेर बसने (एमएच- २०, बीएल- २६६०) जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. अपघात होताच नागरिकांनी धाव घेत जखमी होमगार्ड यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. माहिती मिळताच बिट जमादार धनराज खाकरे यांनी धाव घेत पंचनामा केला. या अपघाताची वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृत होमगार्ड भगवान फरकाडे यांच्यावर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.