सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर) : सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील एका जिनिंगजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त पेट्रोलच्या टँकरला पाठीमागून दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला; तर पाठीमागे बसलेला एक तरुण किरकोळ जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास झाला. सागर बाळा खैरे (वय ३० वर्षे, रा. अनवी) असे मृताचे नाव असून ज्ञानेश्वर श्रीपत जाधव (३३, रा. अनवी) हे जखमी झाले आहेत.
कन्नडहून भोकरदनकडे पेट्रोल घेऊन जाणारा टँकर (एमएच २८ बी ८७२९) सिल्लोडजवळील अग्रवाल जिनिंगजवळ भररस्त्यावर नादुरुस्त झाल्याने उभा होता. या टँकरला रेडियम नव्हते किंवा आजूबाजूला दगड वगैरे काही लावलेले नव्हते. पाठीमागून भराडीकडून अनवीकडे दुचाकी (एमएच २० सीझेड २४९३)वरून सागर बाळा खैरे व ज्ञानेश्वर श्रीपत जाधव हे दोघे भरधाव जाताना त्यांना रात्री अंधारात हा टँकर दिसला नाही. त्यामुळे या टँकरच्या पाठीमागून दुचाकीने जोराने धडक दिली. यात सागर बाळा खैरे हा जागीच ठार झाला; तर ज्ञानेश्वर श्रीपत जाधव हा किरकोळ जखमी झाला.
या अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे, हेडकॉन्स्टेबल सुनील तळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व मृताला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे जखमींवर उपचार करण्यात आले. तर मृत सागर खैरे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.