बदनापुरात १ लाखाच्या गोडतेलाच्या ८ टाक्यांची चोरी
By Admin | Updated: June 22, 2014 00:10 IST2014-06-21T23:28:51+5:302014-06-22T00:10:12+5:30
बदनापूर : शहरातील तीन किराणा दुकानांच्या समोरून १ लाखाच्या गोडतेलाचे ८ लोखंडी ड्रम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.

बदनापुरात १ लाखाच्या गोडतेलाच्या ८ टाक्यांची चोरी
बदनापूर : शहरातील तीन किराणा दुकानांच्या समोरून १ लाखाच्या गोडतेलाचे ८ लोखंडी ड्रम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. विशेष म्हणजे यातील एका दुकानादाराच्या दुसऱ्यांदा पाच गोडतेलाचे ड्रम चोरीस गेले. तर एक दुकान पोलिस ठाण्याशेजारीच आहे, हे विशेष.
शहरात पुन्हा गोडतेलचोर सक्रिय झाले आहेत. व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात १९ जून रोजी रात्री जालना-औरंगाबाद महामार्गावरील न्यू आशीर्वाद किराणासमोरील ६० हजार रूपयांचे एकूण ९०० किलो गोडतेलाचे पाच लोखंडी ड्रम, पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या जैन किराणासमोरील २४ हजारांचे ३६० किलो गोडतेलाचे दोन लोखंडी ड्रम व बाजार गल्लीतील संदीप किराणा समोरील १२ हजार रूपयांचे १८० किलो गोडतेलाचा एक ड्रम अशाप्रकारे ९६ हजारांचे १४४० किलो गोडतेलाचे ५ लोखंडी ड्रम अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
या गोडतेलाच्या टाक्या दोन किंवा तीन वाहनांमधून नेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या दुकानांसमोर त्या वाहनांच्या चाकांचे ठसे दिसत होते. या तीनही घटनास्थळांची सपोनि पंकज जाधव यांनी पाहणी केली. दिलीपकुमार नागोरी यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)