८ कोटी ३३ लाखांचा निधी जिल्ह्याला मंजूर
By Admin | Updated: May 21, 2014 00:49 IST2014-05-21T00:47:20+5:302014-05-21T00:49:29+5:30
हिंगोली : लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेल्या निधी मंजुरीचे आदेश आता आचारसंहिता संपताच निघू लागले आहेत.

८ कोटी ३३ लाखांचा निधी जिल्ह्याला मंजूर
हिंगोली : लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या कचाट्यात सापडलेल्या निधी मंजुरीचे आदेश आता आचारसंहिता संपताच निघू लागले आहेत. जिल्ह्याला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत दोन रस्त्यांच्या कामासाठी ५ कोटी ४६ लाख ९३ हजार रुपयांच्या निधी मंजुरीचे आदेश २० मे रोजी काढण्यात आले. तर साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांध बांधण्यासाठी २ कोटी ८७ लाख रुपयांच्या निधी मंजुरीचे आदेश जलसंधारण विभागाने १९ मे रोजी काढले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्च रोजी जाहीर झाली होती. या आचारसंहितेमुळे अनेक विकासकामांच्या निधी मंजुरीचे आदेश काढण्यात आले नव्हते. १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसर्याच दिवशी या निवडणुकीची आचारसंहिता संपली. त्यानंतर आता प्रलंबित राहिलेल्या निधीला मंजुरी देण्याचे आदेश निघू लागले आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१४-१५ या वर्षांतील प्रशासकीय कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू झाली होती; परंतु मध्येच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने याबाबतची कामे ठप्प झाली होती. आता आचारसंहिता संपल्याने या कामांना मंजुरी देण्याचे आदेश २० मे रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने काढण्यात आले आहे. या आदेशात वसमत तालुक्यातील कानोसा ते पार्डी या साडेपाच कि. मी. रस्त्याच्या कामासाठी एकूण ३ कोटी १ लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच याच तालुक्यातील रांजोना - रेऊलगाव या ४ कि.मी. रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ४५ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन रस्त्यांचे प्रश्न आता मार्गी लागणार आहेत. तसेच साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांध बांधण्यासाठी जिल्ह्याला एकूण २ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांध बांधण्याच्या कार्यक्रमांतर्गत २०१४-१५ या वर्षाकरीता राज्य शासनाने एकूण ५६ कोटी २१ लाख ३९ हजार रुपयांचा निधी टप्पा क्र. २ व ३ अंतर्गत १९ मे रोजी काढलेल्या आदेशाने वितरीत केला आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील ४ तालुक्यांमध्ये २४ साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांध बांधण्यासाठी एकूण २ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैैकी ८० हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला होता. आता उर्वरित २ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश जलसंधारण विभागाचे अवर सचिव नारायण कराड यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी) रस्ते व सिमेंट बांधासाठी निधी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कानोसा ते पार्डी या रस्त्याच्या साडेपाच कि.मी. च्या कामासाठी ३ कोटी १ लाख ६७ हजार रुपयांचा तर रांजोना ते रेऊलगाव या ४ कि. मी. रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ४५ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर. साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांध बांधण्यासाठी जलसंधारण विभागाने जिल्ह्याला मंजूर केला २ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निधी मंजूरीची प्रक्रिया राहिली होती प्रलंबित. अन्य काही विभागांकडूनही जिल्ह्याला विकास कामांसाठी निधी मंजूर केला जाणार असल्याची माहिती. विकासकामांना गती मिळणार.