शॉटसर्किटने लागलेल्या आगीने ८ एकरवरील फळबागा जळून खाक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 18:25 IST2022-04-02T18:25:20+5:302022-04-02T18:25:45+5:30
आज गुढीपाडवा नवीन वर्ष साजरा करण्यात सर्व व्यस्त असताना सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास अचानक शेतात आग लागली

शॉटसर्किटने लागलेल्या आगीने ८ एकरवरील फळबागा जळून खाक; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
सिल्लोड: विद्युतवाहिनीच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीने सर्वे नंबर ३४९ मधील रजाळवाडी शिवारातील आठ एकरवरील फळबागा जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी घडली. आगीमध्ये आंबा, सीताफळ, जांभूळ, करवंदांच्या फळबागांसह त्यातील ठिबक सिंचन प्रणाली, शेतीचे साहित्य, औजारे, वखार, मोटार, पाईप असे साहित्य जळून शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
महेश शंकरपेल्ली यांनी रजाळवाडी शिवारात सन २०१० मध्ये फळबाग लागवड केली. नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने या बागेची जोपासना करण्यात आली. बागेमध्ये त्यांनी विविध झाडांची लागवड करून जैवविविधता जोपासलेली होती. ही सेंद्रिय बाग पाहण्यासाठी कोकण, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणाहून शेतकरी भेट देण्यास येत. दरम्यान, आज गुढीपाडवा नवीन वर्ष साजरा करण्यात सर्व व्यस्त असताना सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास शेतातून गेलेल्या विद्युतवाहिनीच्या घर्षणामुळे ठिणगी पडली. छोट्या ठिणगीमुळे बागेतील वाळलेले गवत पेटले, हवा वाहत असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. काही वेळातच आगीमध्ये आंबा, सीताफळ, जांभूळ, करवंदांच्या फळबागांसह त्यातील ठिबक सिंचन प्रणाली, शेतीचे साहित्य, औजारे, वखार, मोटार, पाईप असे साहित्य जळून खाक झाले.
या घटनेची माहिती मिळताचतलाठी सज्जा सिल्लोड काशिनाथ ताठे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. महावितरण सिल्लोडचे अधिकारी यांनी येऊन घटनास्थळी प्राथमिक चौकशी करून, पंचनामा करण्याचे आश्वासन दिले असे शंकरपेल्ली यांनी सांगितले. झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाने करून द्यावी, अशी शंकरपेल्ली यांनी मागणी केली आहे. दरम्यान, सन २०१८ मध्ये सुद्धा अशाच प्रकारे आग लागून त्यांची दीड एकर बाग जळाली होती. त्यावेळी सुद्धा त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.