740 जणांना जीवदान
By Admin | Updated: July 7, 2014 00:19 IST2014-07-07T00:17:25+5:302014-07-07T00:19:31+5:30
विलास चव्हाण, परभणी येथील जिल्हा रुग्णालयात मागील वर्षभरात कीटकनाशक प्राशन करणाऱ्या ७९० रुग्णांपैकी तब्बल ७४० जणांचे जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे़

740 जणांना जीवदान
विलास चव्हाण, परभणी
येथील जिल्हा रुग्णालयात मागील वर्षभरात कीटकनाशक प्राशन करणाऱ्या ७९० रुग्णांपैकी तब्बल ७४० जणांचे जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे़
आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीमुळे मनुष्याचे आयुष्यमान वाढत आहे़ परंतु, काही जण घरातील क्षुल्लक भांडणे, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जीवनात आलेल्या नैराश्यातून कीटकनाशक प्राशन करून आपला लाखामोलाचा जीव संपविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना जीवनदान देण्याचे कार्य जिल्हा रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
पूर्वी ग्रामीण भागात एकत्र कुंटुब पद्धत अस्तित्वात होती़ त्यावेळी घरातील वडिलधारी अथवा कारभारी व्यक्ती कोणत्याही संकटाला सामोरे जात होती. त्यामुळे घरातील लहान भांवडांना अथवा महिलांना संकटाला कसे सामोरे जावे याचे एक प्रकारे प्रशिक्षण मिळत होते़ परंतु, गेल्या काही वर्षापासून विभक्त कुंटुंब पद्धत अस्तित्वात येत आहे़ यामुळे ‘हम दो हमारे दो’ या कुंटुंबपद्धतीमुळे मुलांना सामाजिक जिम्मेदारीचे भानच राहिले नाही़ जो-तो स्वत:साठीच जगत आहे़ घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास कुंटुंबावर आभाळ कोसळत आहे़ अशा प्रतिकूल परिस्थितीत आपले कोणीच जवळचे नसल्याने अनेक जण संकटाला सामोरे जाण्याऐवजी कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपवत आहेत़
जिल्ह्यात २०१३-१४ या वर्षभरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केलेल्यांची संख्या खालीलप्रमाणे - एप्रिल महिन्यात- ५, मे - ५, जून- ३ , जुलै- ३, आॅगस्ट- ४, सप्टेंबर- ९, आॅक्टोबर- ६, नोव्हेंबर- १, डिसेंबर- ३, जानेवारी- ६, फेब्रुवारी- २, मार्च-३ असे एकूण ५० जणांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़
जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार
कीटकनाशक प्राशन केलेले अथवा साप चावलेल्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार केले जातात़ परंतु, खाजगी रुग्णालयात मात्र याच उपचारांसाठी ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो़
७९० जणांवर उपचार
येथील जिल्हा रुग्णालयात कीटकनाशक प्राशन करणाऱ्या तब्बल ७९० जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले़ ते पुढीलप्रमाणे- एप्रिल महिन्यात- ४०, मे - ५९, जून- ५० , जुलै- ४८, आॅगस्ट- ९९, सप्टेबर- ९९, आॅक्टोबर- ६८, नोव्हेबर- ५५, डिसेंबर- ६८, जानेवारी- १००, फेब्रुवारी- ५३, मार्च-५१ असे एकूण ७९० जणांनी कीटकनाशक प्राशन केले होते़
सावधगिरी बाळगा
आॅगस्ट ते आॅक्टोबर या महिन्यात सोयाबीन, कपाशीवर फवारणी करताना शेतकरी किंवा मजूर कोणतीही सुरक्षा बाळगत नाहीत़ त्यामुळे कीटकनाशक तोंडात जाते. तसेच शेतात साप चावण्याच्या घटनाही घडतात़ यामुळे आॅगस्ट ते आॅक्टोबर या महिन्यात कीटकनाशक प्राशन व साप चावलेले रुग्ण अधिक येतात. या काळात शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त
घरगुती भांडणे, ताण-तणाव, संकटांला घाबरून अनेक जण कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करीत आहेत़ यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त असल्याची माहिती, अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख डॉ़ प्रकाश डाके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़