फिस भरली पण अधिकची रक्कम पाठवली सांगत मुख्याध्यापिकेकडूनच ७२ हजार उकळले
By सुमित डोळे | Updated: October 4, 2024 18:40 IST2024-10-04T18:40:24+5:302024-10-04T18:40:54+5:30
पालक बोलतोय म्हणून फोन, शुल्क भरल्याचा खोटा मेसेज पाठवून क्षणात ७२ हजार उकळले

फिस भरली पण अधिकची रक्कम पाठवली सांगत मुख्याध्यापिकेकडूनच ७२ हजार उकळले
छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-४ परिसरात नर्सरी शाळा चालवणाऱ्या महिलेला विद्यार्थ्याचे शुल्क भरण्याचा बहाणा करून सायबर गुन्हेगारांनी काही मिनिटांमध्ये ७२ हजार रुपयांचा गंडा घातला. गुरुवारी महिलेने एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
एन-१ मध्ये राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेची एन-४ परिसरात नर्सरी शाळा आहे. ऑगस्ट महिन्यात घरी असताना त्यांना अज्ञात क्रमांकावरून कॉल आला. खातून नावाच्या विद्यार्थ्याचे पालक बोलत असल्याचे सांगून कॉलवरील व्यक्तीने ८ हजार रुपये शुल्क पाठवल्याचे सांगितले. शिवाय, मेसेज तपासण्याची विनंती केली. महिलेला ८ ऐवजी ८० हजार रुपये प्राप्त झाल्याचा मेसेज आला होता. काॅलवरील व्यक्तीने ८ ऐवजी चुकून ८० हजार रुपये पाठवले गेल्याचे सांगून ७२ हजार रुपये परत करण्याची विनंती केली. महिलेला मेसेज प्राप्त झालेला असल्याने विश्वास ठेवून तिने सदर व्यक्तीला ऑनलाइन ७२ हजार पाठवून दिले.
...पैसे आल्याचा मेसेज खोटा
महिलेचे पैसे नजराना खातून नावाच्या खात्यावर गेले. परंतु, थोड्या वेळाने त्यांना त्यांच्या शाळेत खातून नावाचा एकही विद्यार्थी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी बँक स्टेटमेंट तपासले. तेव्हा खात्यात ८० हजार रुपये जमाच झालेले नव्हते. पैसे आल्याचे मेसेजही सायबर गुन्हेगारांनी बनावट पाठवल्याचे उघड झाले.
सर्व माहिती गुन्हेगारांकडे
शाळा चालवणाऱ्या महिलेचे नाव, बँक खाते क्रमांक, शाळेचे नाव सर्वकाही धक्कादायकरीत्या सायबर गुन्हेगाराकडे होते. शिवाय, बँकेकडून पैशांच्या व्यवहाराचे मेसेजप्रमाणेच पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांच्या मोबाइलवर पाठवण्यात आले. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.