७ लाखांचा गुटखा, १०० किलो खवा जप्त

By Admin | Updated: September 8, 2014 00:33 IST2014-09-08T00:26:30+5:302014-09-08T00:33:19+5:30

औरंगाबाद : गुजरातमधून आलेला ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा गुटखा आणि १०० किलो खवा जप्त केला.

7 lakhs of gutkha, 100 kg of Khwa seized | ७ लाखांचा गुटखा, १०० किलो खवा जप्त

७ लाखांचा गुटखा, १०० किलो खवा जप्त

औरंगाबाद : गुटखाबंदी असताना औरंगाबादेत विक्री करण्यासाठी गुजरातमधून आलेला ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा गुटखा आणि नियमांना तिलांजली देत आणलेला १०० किलो खवा अन्न व औषध प्रशासन विभागाने टॅ्रव्हल्स बसचा पाठलाग करून रविवारी जप्त केला.
अन्नसुरक्षा निरीक्षक गजानन गोरे यांनी सांगितले की, सकाळी गुजरातमधून आलेल्या एका ट्रॅव्हल्स बसला (क्रमांक जीजे-०१ सीटी- ६०९२) आम्ही कन्नडजवळ थांबण्याचा इशारा केला. मात्र, बसचालकाने बस थांबविली नाही. त्यानंतर आम्ही तेथून बसचा पाठलाग सुरू केला. शरणापूर फाट्याजवळ बस अडविण्यात आली. त्यावेळी बसची झडती घेतली असता बसमध्ये बेकायदेशीरपणे आणलेला १०० किलो खवा आढळला. तसेच बसच्या टपावर लपवून शहरात आणला जात असलेला ७ लाख १२ हजार ४०० रुपयांचा गुटखा आढळला. यात तंबाखू असलेला रोशनी, बाबा गुटखा, रजनीगंधा पान मसाला आदी गुटख्यांचा समावेश आहे.
दुग्धजन्य खवा आणि इतर अन्नपदार्थांची वाहतूक करण्यासंदर्भात नियमावली आहे. वातानुकूलित यंत्रणेत तसेच ज्या वाहनातून वाहतूक करणार आहेत, त्यास अन्न व औषध प्रशासनाकडून परवाना घ्यावा लागतो. मात्र, खवामालक आणि बसचालकाने कोणताही परवाना घेतला नाही, तसेच स्वच्छतेचे निकष पाळले नाहीत. त्यामुळे बसमधील १०० किलो खवा ताब्यात घेण्यात आला. हा खवा सिल्लोड येथील व्यापाऱ्याच्या नावाने शहरात आला होता. त्याचा शोध घेणे सुरू असल्याचे निरीक्षक गोरे यांनी सांगितले. बसचालक सरदारसिंग राठोड (रा. उदयपूर, राजस्थान) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 7 lakhs of gutkha, 100 kg of Khwa seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.