'जलसंधारण'मधील अनुशेष दूर होणार; ६७० अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्रे

By बापू सोळुंके | Updated: February 8, 2025 19:38 IST2025-02-08T19:38:13+5:302025-02-08T19:38:27+5:30

मृद व जलसंधारण विभागात राज्यातील सर्वाधिक रिक्त पदे मराठवाड्यात आहेत.

670 engineers in the Water Conservation Department will receive appointment letters from the Chief Minister | 'जलसंधारण'मधील अनुशेष दूर होणार; ६७० अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्रे

'जलसंधारण'मधील अनुशेष दूर होणार; ६७० अभियंत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळणार नियुक्तीपत्रे

छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या मृद व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी गट ‘ब’ दर्जाच्या अभियंत्यांची सुमारे बाराशे पदे रिक्त आहेत. शासनाने नुकत्याच राबविलेल्या भरती प्रक्रियेतून जलसंधारण विभागाला ६७० जलसंधारण अधिकारी मिळणार आहे. या अभियंत्यांना पुढील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली.

राज्याच्या सात झोनअंतर्गत ३५ जिल्ह्यांमध्ये मृद व जलसंधारण विभागाचे काम चालते. भूजलपातळीत वाढ व्हावी, यासाठी काम करणाऱ्या मृद व जलसंधारण विभागात अनेक वर्षांपासून जलसंधारण अधिकाऱ्यांची पदभरती झाली नव्हती. परिणामी, रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षी राज्य सरकारने जलसंधारण विभागाला ६७० पदे भरण्यास परवानगी दिली होती. गतवर्षी टीसीएस या संस्थेच्यावतीने ही भरती प्रक्रिया राबविली. जलसंधारण अधिकारी पदासाठी १४ ते १६ जुलैदरम्यान लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे ६० हजार उमेदवारांनी हजेरी लावली होती. कॅटेगिरीनिहाय गुणवत्ता यादीतील ६७० उमेदवारांची निवड करण्यात आली. या उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी १८ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवड होऊनही अद्याप नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. कागदपत्रांची पडताळणी झालेले उमेदवार मागील तीन महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या उमेदवारांकडून नियुक्तीपत्रे कधी मिळणार याविषयी सतत विचारणा होत असते. आता या उमेदवारांना अधिक काळ प्रतीक्षेत न ठेवता त्यांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय जलसंधारण विभागाने घेतला आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना पुढील आठवड्यात मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बोलावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सर्वाधिक रिक्त पदे मराठवाडा विभागात
मृद व जलसंधारण विभागात राज्यातील सर्वाधिक रिक्त पदे मराठवाड्यात आहेत. शासनाने एकूण रिक्त पदांच्या केवळ ४० टक्के पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत आठ जिल्ह्यांतील एकूण १६७ जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे भरण्यास मंजुरी मिळाली होती.

कोणत्या विभागात किती जणांना मिळणार नियुक्तीपत्रे
छत्रपती संभाजीनगर= १६७
नागपूर-९९
अमरावती-- १०८
कोकण--- ६१
नाशिक ---११०
पुणे-- ९१

Web Title: 670 engineers in the Water Conservation Department will receive appointment letters from the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.