६३३ अंगणवाड्या लवकरच इमारतीत

By Admin | Updated: March 23, 2016 00:20 IST2016-03-23T00:18:54+5:302016-03-23T00:20:14+5:30

रामेश्वर काकडे, नांदेड उघड्यावर अन् असुरक्षिततेच्या ठिकाणी ज्ञानार्जनासाठी भरणाऱ्या जिल्ह्यातील सहाशेवर अंगणवाड्यांना आता छत मिळणार आहे़

633 Anganwadis soon in the building | ६३३ अंगणवाड्या लवकरच इमारतीत

६३३ अंगणवाड्या लवकरच इमारतीत

रामेश्वर काकडे, नांदेड
उघड्यावर अन् असुरक्षिततेच्या ठिकाणी ज्ञानार्जनासाठी भरणाऱ्या जिल्ह्यातील सहाशेवर अंगणवाड्यांना आता छत मिळणार आहे़ त्यासाठी निधीही मिळाला असून त्यामुळे हजारो चिमुकल्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे़
जिल्ह्यात एकूण ३ हजार १० अंगणवाड्या असून त्यापैकी २३४५ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. तर ६६५ अंगणवाड्या इमारतीअभावी उघड्यावर भरतात. मात्र यावर्षी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून ६०० अंगणवाड्यांना इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध होणार आहे़ तर ३३ अंगणवाड्या जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झाल्यामुळे एकुण ६३३ अंगणवाड्यांना इमारती मिळणार आहेत. त्यामुळे प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने अंगणवाडी इमारतीचा प्रश्न निकाली निघणार आहे़ इमारत बांधकामासाठी नुकतीच मंजुरी मिळाली असून मार्च २०१७ पर्यंत बांधकामावर निधी खर्च करावयाचा आहे.
त्यासाठी माहूर आणि किनवट तालुक्यासाठी प्रती अंगणवाडी ६ लाख ६० हजार रुपये तर इतर तालुक्यासाठी प्रती अंगणवाडी ६ लाख रुपये याप्रमाणे निधी मिळणार आहे. ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करुन पंचायत समिती स्तरावर पाठवायचा असून पंचायत समिती स्तरावरुन सदर प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर सदर ग्रामपंचायतींना अंगणवाडी बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतरच निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे़
आजपर्यंत जिल्ह्यात विविध योजनेतंर्गत अंगणवाडी बांधकामांना मंजुरी देवून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यात राष्ट्रीय समविकास योजना २००७-८ मध्ये नऊ अंगणवाड्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता़ मानव विकास मिशन २००७-८ मध्ये २८, २००९-१० मध्ये ४४, २०११-१२ मध्ये ७४, २०१२-१३ मध्ये २६, २०१३-१४ मध्ये ७४ याप्रमाणे २४६ अंगणवाड्यांना इमारती मंजूर केल्या आहेत.
तर जिल्हा वार्षिक योजनेतून २००८-९- २३, २००९-१०-६६, २०१०-११-२५६, २०११-१२-१२२, २०१२-१३ मध्ये ९६, २०१३-१४-२७ अशा ५९० तर ग्रामीण पायाभूत विकास योजनेतंर्गत २०१०-११-१७४, २०११-१२-२० अशा १९४ अंगणवाड्यांना इमारती मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेंतर्गत- २०१०-११ मध्ये ५७, २०११-१२-३२, २०१२-१३-२६ तर जिल्हा वार्षिक आदीवासी उपाययोजना स्टेट २०१३-१४-८६, आदिवासी उपाययोजना डीपीडीसीतून २७ अशा २२८ तर तेराव्या वित्त आयोगातून २०११-१२ मध्ये ३७ व २०१२-१३ मध्ये ३२ अशा ६९ याप्रमाणे विविध योजनेतून १३३६ अंगणवाड्यांना इमारत बांधकांमासाठी मंजुरी मिळाली आहे़ यापैकी ७४५ कामे पूर्ण झाली असून त्यावर २७ कोटी ८६ लाख ६४ हजार ३७६ रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर ३२५ कामे प्रगतीपथावर असून २६६ कामे मंजुरी मिळूनही सुरुच झाली नाहीत. या वर्षात बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार असल्याने एकूणच आता जिल्ह्यातील जवळपास सर्वच उघड्यावर भरणाऱ्या अंगणवाड्यांचा प्रश्न निकाली निघणार आहे़

Web Title: 633 Anganwadis soon in the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.