दरोडाप्रकरणी तब्बल ४० वर्षांनंतर ६० वर्षीय वृद्धाची निर्दोष सुटका; गुन्ह्यातील गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 08:53 IST2025-12-09T08:52:13+5:302025-12-09T08:53:18+5:30
याबाबत छावणी पोलिस ठाण्यात ३९५ आयपीसीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता.

दरोडाप्रकरणी तब्बल ४० वर्षांनंतर ६० वर्षीय वृद्धाची निर्दोष सुटका; गुन्ह्यातील गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता
डॉ. खुशालचंद बाहेती
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : तब्बल ४० वर्षांपूर्वीच्या दरोडा प्रकरणात ६० वर्षीय आरोपीची छत्रपती संभाजीनगर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
२१ नोव्हेंबर १९८४ रोजी पाच जणांनी औरंगाबादच्या बाबा पेट्रोल पंप परिसरातून रिक्षा भाड्याने घेऊन रात्री १० वाजता माळीवाड्यातील पंडित आधाव यांच्या फार्म हाऊसवर दरोडा घातला होता. याबाबत छावणी पोलिस ठाण्यात ३९५ आयपीसीचा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. गुन्ह्यातील गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता.
जामिनावर सुटल्यावर सर्व आरोपी झाले होते फरार
कोर्टातून जामिनावर सुटल्यावर सर्व आरोपी फरार झाले. २०१९ मध्ये यापैकी एकाला पकडून पोलिसांनी कोर्टात हजर केले. त्याच्याविरुद्ध फेब्रुवारी २०२४ पासून खटला सुरू झाला व डिसेंबर २०२५ मध्ये न्यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी त्याची निर्दोष मुक्तता करत ४० वर्षांच्या न्यायिक क्लेश प्रक्रियेतून सुटका केली. सरकारी वकील बाळासाहेब मेहर यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
४० वर्षे आरोपी शहरात बिनबोभाट रिक्षा चालवतो
गुन्ह्याचे दोन तपास अधिकारी- छावणी ठाण्याचे तेव्हाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक दीपकसिंग गौर १२ वर्षांपूर्वी एसीपी म्हणून, तर प्राथमिक तपास केलेले त्या वेळचे प्रोबेशनर पीएसआय ७ वर्षांपूर्वी निवृत्त झाले.
आश्चर्य म्हणजे, सर्व साक्षीदार व पोलिस अधिकाऱ्यांनी २० वर्षांचा असताना अटक झालेल्या आरोपीला तो ६० वर्षांचा झाला असतानाही कोर्टात बरोबर ओळखले.
४० वर्षे आरोपी शहरात रिक्षा चालवतो. त्याला लायसन्स, परमिट, बॅज मिळण्यासाठी त्यांच्यावरील गंभीर गुन्ह्याचा कोणताही अडथळा आला नाही, हे विशेष.
फरार आरोपी मिळाल्यास खटला पुन्हा सुरू होणार
न्यायालयाला खटल्याची कागदपत्रे तुकडे पडू नयेत म्हणून अत्यंत जपून हाताळावी लागली. ५ फरार आरोपी मिळतील, तेव्हा खटला पुन्हा सुरू होईल. देशभरात दशकानुदशके प्रलंबित असलेल्या शेकडो खटल्यापैकी हा एक आहे.
उरणमध्ये दोन खटले ७२ वर्षांपासून प्रलंबित
महाराष्ट्रातील सर्वांत जुने खटले उरण (रायगड) न्यायालयात आहेत. दारूबंदी कायद्याचे २ खटले ७२ वर्षांपासून, तर नोकराने केलेल्या चोरीचा १ खटला ६८ वर्षांपासून प्रलंबित आहे. हे खटले कसे निकाली निघणार हा प्रश्नच आहे.