५६ उमेदवार निवडणूक आखाड्यात
By Admin | Updated: October 3, 2014 00:32 IST2014-10-03T00:25:41+5:302014-10-03T00:32:12+5:30
उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी निवडणूक आखाड्यातून ५० टक्के उमेदवारांनी माघार घेतली आहे.चार विधानसभा मतदारसंघात मिळून

५६ उमेदवार निवडणूक आखाड्यात
उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी निवडणूक आखाड्यातून ५० टक्के उमेदवारांनी माघार घेतली आहे.चार विधानसभा मतदारसंघात मिळून ५६ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात उभे आहेत. एकूणच चारही विधानसभा मतदारसंघात निवडीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भूम-परंडा-वाशी या विधानसभा मतदार संघातून आठ जणांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे प्रमुख पक्षांसोबतच अपक्ष मिळून दहाजण निवडणूक रिंगणात उरले आहेत. तुळजापूर मतदार संघातूनही ३१ पैकी १८ जणांची मनधरणी करण्यात यश आले आहे. यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून काढता पाय घेतल्याने आता तेराजण रिंगणात उरले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली होती. त्यांची मनधरणी करण्याचे काम मागील तीन-चार दिवसांपासून सुरु होते. अखेर श्रेष्ठींच्या प्रयत्नाला यश आले असून, धुरगुडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जीवनराव गोरे यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरणार असल्याचे बोलले जात आहे. उमरगा विधानसभा मतदार संघातूनही ११ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे निवडणूक आखाड्यामध्ये केवळ १३ जण उरले आहेत. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्यांची संख्या मोठी असल्याने याचा नेमका कोण-कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला फटका बसतो हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)