दहा वर्षांत ५०७ पाणीपुरवठा योजना बंद
By Admin | Updated: November 26, 2014 01:08 IST2014-11-26T00:31:31+5:302014-11-26T01:08:08+5:30
संजय कुलकर्णी ,जालना जिल्ह्यात मागील दहा वर्षात महावितरणच्या देयकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या ५०७ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.

दहा वर्षांत ५०७ पाणीपुरवठा योजना बंद
संजय कुलकर्णी ,जालना
जिल्ह्यात मागील दहा वर्षात महावितरणच्या देयकांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असलेल्या ५०७ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या देयकांची एकूण थकबाकी १ कोटी ६५ लाख रुपये एवढी आहे.
सध्या ग्रामीण भागात दुष्काळाची चाहूल लागली आहे. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून शासन करोडो रुपये खर्च करून योजना तयार करत आहेत. मात्र या योजना कितपत टिकतात, याकडे नंतर दुर्लक्ष होते.
योजनांची देखभाल व दुरूस्ती अनेक ठिकाणी व्यवस्थित होत नाही. ग्रामपंचायतीकडून महावितरणच्या देयकांच्या थकबाकीचा भरणा न झाल्यास ऐनवेळी वीजपुरवठा खंडित करावा लागतो. सध्या शासनाच्या धोरणानुसार पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला जात नाही. परंतु काही नवीन योजना आणण्यासाठी जुन्या योजनांच्या थकबाकीचा मुद्दा अडचणीचा ठरतो. त्यामुळे गावाला नवीन पाणीपुरवठा योजना आणण्यात अडचणी येत आहेत.
वसुलीसाठी प्रयत्न
यासंदर्भात वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बी.टी. पानढवळे म्हणाले की, पाणीपुरवठा योजनांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून त्यापैकी ५०७ योजना बंद झालेल्या आहेत. त्यांची देयके देण्यास आता ग्रामपंचायतींकडून टाळाटाळ होत आहे. त्यामुळे या वसुलीसंदर्भातील मुद्दा शासन पातळीवर चर्चित आहे. (समाप्त)