एक मराठा लाख मराठा लिहिलेल्या ५००० मतपत्रिका बाद
By | Updated: December 4, 2020 04:13 IST2020-12-04T04:13:33+5:302020-12-04T04:13:33+5:30
औरंगाबाद : पदवीधरच्या निवडणुकीसाठी पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू असताना जवळपास ५३८३ मतपत्रिका बाद ठरल्या. विशेष म्हणजे या सर्व बाद ...

एक मराठा लाख मराठा लिहिलेल्या ५००० मतपत्रिका बाद
औरंगाबाद : पदवीधरच्या निवडणुकीसाठी पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू असताना जवळपास ५३८३ मतपत्रिका बाद ठरल्या. विशेष म्हणजे या सर्व बाद मतपत्रिकांवर ''एक मराठा, लाख मराठा, मिळेल अनुदान तरच मतदान'' या घोषणा लिहिल्या आहेत. यातून रेंगाळलेल्या मराठा आरक्षणाचा मतदारांमधील तीव्र रोष दिसून आला.
मराठवाडा पदवीधर मतमोजणीच्या पहिल्या फेरीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांनी जवळपास १७ हजारांची आघाडी घेतली. पहिल्या फेरीच्या ५६ हजार मतांमध्ये अवैध ठरलेल्या मतांची संख्या लक्षणीय ठरली आहे. या फेरीत तब्बल ५३८३ मते बाद झाली. बाद झालेल्या सर्वच मतपत्रिकांवर ''एक मराठा लाख मराठा, मिळेल अनुदान तरच मतदान,'' असे लिहिले आहे.
मतमोजणी प्रक्रिया....
सकाळी मतमोजणी सुरू होताच सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका या एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकण्यात आल्या. दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी सुरू झाली. त्यानंतर ३५ उमेदवारांच्या पसंतीनुसार मतपत्रिका पिजन बॉक्समध्ये वर्ग केल्या जात होत्या. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार असून, त्यामध्ये वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरेल. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येईल.