कन्नड पंचायत समितीमधून मंजूर कामाच्या ५०० संचिका गहाळ; संगणकातील डेटाही डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:59 IST2025-08-07T19:47:48+5:302025-08-07T19:59:31+5:30
बिलासाठी लाभधारक शेतकरी पंचायत समिती कार्यालयात दररोज चकरा मारत आहेत.

कन्नड पंचायत समितीमधून मंजूर कामाच्या ५०० संचिका गहाळ; संगणकातील डेटाही डिलीट
- प्रवीण जंजाळ
कन्नड : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभांच्या योजनेतून गेल्या ४ वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कामांच्या जवळपास ५०० संचिका गहाळ झाल्या असून, संगणकातील डेटाही डिलीट झाला आहे. त्यामुळे बिलासाठी लाभधारक शेतकरी पंचायत समिती कार्यालयात दररोज चकरा मारत आहेत.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यात सिंचन विहिरी, गाय गोठे, वृक्षलागवड आदी योजनांचा समावेश आहे. ४ वर्षांपूर्वी तालुक्यातील जवळपास ५०० शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरी, गाय गोठे, वृक्षलागवड आदी योजनांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर संबधित शेतकऱ्यांनी आज ना उद्या निधी मिळेल, म्हणून शेतकऱ्यांनी उसनवारीने व व्याजाने पैसे उभारून कामही केले; परंतु त्यांना या कामांसाठी शासनाकडून देण्यात येणारा मिळाला नाही. या कामांचे प्रस्ताव ऑनलाइन करण्यात आले होते. या शेतकऱ्यांकडून निधीसाठी गेल्या काही दिवसांपासून तगादा सुरू असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी मंजुरीच्या हस्तलिखित मूळ संचिकांचा शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर संगणकावर शोध घेतला असता त्यातील डेटाही डिलीट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना निधी वितरणाचे आदेश (FTO) देणे अशक्य झाले नाही. त्यामुळे हे शेतकरी संकटात सापडले आहेत.
१० हजार कामांना निधीची मागणीच नाही
तालुक्यात रोहयोंतर्गत सिंचन विहीर, गाय गोठे, पाणंद रस्ते व वृक्षलागवडची एकूण १ हजार २५१ कामे मंजूर असून, त्यातील ७ हजार ७५४ कामे प्रत्यक्ष सुरू झाली आहेत. त्यातील फक्त १ हजार ८३० कामांच्या निधीचीच मागणी पंचायत समितीने केली आहे. त्यामुळे तब्बल १० हजार ४२१ कामांसाठी निधी का मागितला गेला नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
कामाचे नाव, मंजूर कामे, सुरू झालेली कामे, निधी मागणी केलेली कामे
सिंचन विहिरीसाठी : मंजूर कामे - ५९१५, सुरू झालेली - ३१९७, निधी मागणी - ७००
गाय गोठे : मंजूर कामे - ५१४०, सुरू - ३८३५, निधी मागणी - १०५०
वृक्षलागवड : मंजूर - ७३८, सुरू - ४३५, निधी मागणी - ५०
पाणंद रस्ते : मंजूर - ४५८, सुरू - २८७, निधी मागणी - ३०