‘५० टक्के, एकदम ओक्के’, सवलतीने महिला खुश; साधी बस असो की शिवशाही, तिकीट अर्धेच
By संतोष हिरेमठ | Updated: March 20, 2023 13:20 IST2023-03-20T13:19:50+5:302023-03-20T13:20:31+5:30
खासगी बसच्या महिला प्रवासीही ‘लालपरी’कडे; साधी बस असो की शिवशाही, तिकीट अर्धेच

‘५० टक्के, एकदम ओक्के’, सवलतीने महिला खुश; साधी बस असो की शिवशाही, तिकीट अर्धेच
छत्रपती संभाजीनगर : ‘लालपरी’ म्हणजे एस.टी. बसमधून प्रवास करताना ‘ ५० टक्के, एकदम ओक्के’ अशीच काहीशी भावना प्रत्येक महिला व्यक्त करीत आहे. कारण प्रवासात केवळ ५० टक्केच भाडे आकारले जात आहे. परिणामी, खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलाही एस.टी.कडे वळत आहे. त्यामुळे अवघ्या दोनच दिवसांत जिल्ह्यात एस.टी.ने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यातून एस.टी.चे उत्पन्नही दुपटीने वाढले आहे.
एस.टी. महामंडळाने १७ मार्चपासून महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ६५ वर्षांवरील महिलांना ५० टक्के सवलत दिली जात होती. परंतु, आता प्रत्येक महिलेला ही सवलत दिली जात आहे. त्यामुळे खासगी बसने प्रवास करणाऱ्या महिलाही एस.टी.ने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत.
साधी बस असो की शिवशाही, तिकीट अर्धेच
एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात लालबस म्हणजे साधी, एमएस बाॅडीची बस, शिवशाही, शिवनेरी बसचा समावेश आहे. बस कोणतीही असो, त्यात महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळे खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलाही आता एस.टी. बसकडे वळत आहे.
...असे वाढले जिल्ह्यातील महिला प्रवासी
बसस्थानक - १७ मार्च-१८ मार्च
सिडको- १,१८५-३,९५३
मध्यवर्ती- १,३७१-३,६०४
पैठण- १,८७२-५,३९८
सिल्लोड- २,२५२-४,१०४
वैजापूर- २,२९२-४,१४४
कन्नड- २,८७२-४,९९८
गंगापूर- १,८०१-४,००५
सोयगाव- ९,११-२,४९८
एकूण- १४,५५६-३२,७०४
असे वाढले ‘एसटी’चे उत्पन्न
एस.टी. महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाला १७ मार्चला महिला प्रवाशांच्या वाहतुकीतून ४ लाख ७६ हजार १७५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे १८ मार्चला हे उत्पन्न ११ लाख ९५ हजार ८८५ इतके वाढले.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था होईल बळकट
‘महिला सन्मान योजने’अंतर्गत सरसकट सर्व महिलांना एस.टी. प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. या योजनेची व्याप्ती आगामी काळात वाढून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होण्यास मदत मिळेल.
- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ