लहानमुलांच्या वादातील मारहाणीनंतर ४० वर्षीय व्यक्तिचा मृत्यू
By राम शिनगारे | Updated: March 6, 2023 18:34 IST2023-03-06T18:33:57+5:302023-03-06T18:34:06+5:30
चिकलठाणा परिसरातील घटना : एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

लहानमुलांच्या वादातील मारहाणीनंतर ४० वर्षीय व्यक्तिचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : लहान मुलांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या ४० वर्षाच्या व्यक्तीचा काही वेळानंतर मृत्यू झाला. हा मृत्यू मारहाणीमुळे झाला की, ह्रदयविकाराच्या धक्क्याने याविषयीचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी एमआयडीसी सिडको अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, डॉक्टरांच्या अहवालानंतर गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
दशरथ अंबादास रोकडे (४०, रा. मोतीवाला कॉलनी, चिकलठाणा) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दशरथ रोकडे हे मजुरी करतात. त्यांच्या शेजारीच बहिणी उषा हातागळे राहते. बहिणी मुलाचे शेजाऱ्याच्या लहान मुलांसोबत खेळण्यावरून वाद झाला होता. हा वाद सोडविण्यासाठी दशरथ रोकडे गेले. त्याठिकाणी त्यांना शेजाऱ्यांनी बेदम मारहाण केली.
हा वाद पोलिसांनी हस्तक्षेप करीत साेडविला. यानंतर काही वेळातच दशरथ यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना मिनी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची पोलिसांनी नोंद केली असून, अधिक तपास उपनिरीक्षक व्ही.जे. पुर्णपात्रे करीत आहेत. दशरथ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, दशरथची बहिण उषा हातागळे यांनी दशरथचा मृत्यू हा मारहाणीत झाला असून, मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देणार असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
अंतिम अहवालाची प्रतीक्षा
दशरथचा प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या धक्क्याने झाला आहे. मात्र, व्हिसेरा जपून ठेवला असून, डॉक्टरांचा अंतिम अहवाल आल्यानंतर संबंधितांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे निरीक्षक गौतम पातारे यांनी सांगितले.