ग्रंथालय अनुदान वाढीमुळे ४० कोटींचा बोजा
By Admin | Updated: June 25, 2014 01:05 IST2014-06-25T00:08:19+5:302014-06-25T01:05:54+5:30
जालना : ग्रंथालयांच्या अनुदानात ५० टक्के वाढीच्या निर्णयामुळे तिजोरीवर ४० कोटी रुपयांचा बोजा वाढेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ग्रंथालय अनुदान वाढीमुळे ४० कोटींचा बोजा
जालना : राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात ५० टक्के वाढीच्या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ४० कोटी रुपयांचा बोजा वाढेल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
राज्यात १२ हजार ग्रंथालये आहेत. त्या ग्रंथालयांची महसूल विभागांमार्फत गेल्यावर्षी विशेष पडताळणी करण्यात आली. त्यातुन ५ हजार ५०० ग्रंथालये उत्तम अवस्थेत असल्याचे पडताळणीतून निदर्शनास आले असल्याचे टोपे यांनी म्हटले.
या पडताळणीतून महसूल यंत्रणेने ९२५ ग्रंथालय कायम बंद करावेत, असे सुचविले असून, ३५० ग्रंथालयांना त्रुटीची दुरूस्ती करण्यासंदर्भात राज्यसरकारने तीन महिन्यांचा अवधी दिल्याचे टोपे यांनी म्हटले. या कालावधीत ही ग्रंथालये त्रुटींची पूर्तता करतील, अटी व शर्थींची पूर्तता करीत वाढीव अनुदानास पात्र ठरतील, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला. उत्तम असणाऱ्या ग्रंथालयांच्या अनुदानात सरकारने ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ४० कोटी रुपयांचा बोजा वाढणार असल्याचे टोपे यांनी म्हटले. (प्रतिनिधी)