जिल्ह्यात ४ टक्केच पाऊस
By Admin | Updated: June 21, 2014 00:54 IST2014-06-21T00:10:41+5:302014-06-21T00:54:43+5:30
उस्मानाबाद : आस्मानी, सुलतानी संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याकडे यंदाही मृगाने पाठ फिरविल्याचे दिसत आहे़
जिल्ह्यात ४ टक्केच पाऊस
उस्मानाबाद : आस्मानी, सुलतानी संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याकडे यंदाही मृगाने पाठ फिरविल्याचे दिसत आहे़ तुळजापूर, येणेगूर परिसरातील पाऊस वगळता इतरत्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे़ आजवर केवळ ४़२२ टक्के पाऊस झाला असून, जिल्ह्यातील ६३ गावांसह ९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, १४२ गावांसाठी २२१ विहिरी, कुपनलिका अधिग्रहित करण्यात आल्या आहेत़ पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांचे जोरदार पावसाकडे लक्ष लागले आहे़
तीन वर्षाचा दुष्काळ आणि यंदाची गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे़ यंदाच्या उन्हाळ्यात शहरी भाग वगळता ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत़ तर या नुकसानीनंतरही खरिपावर उत्पन्न घेऊ या आशेने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली आहेत़ मात्र, निम्मा महिना संपला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे़
जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने टंचाईच्या झळा कायम आहेत़ भूम तालुक्यातील ७९ गावे, वाड्यांसाठी ३१ टँकर, तर ३९ गावांसाठी ६१ कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ उस्मानाबाद तालुक्यात २ गावात टँकर सुरू असून, ३८ गावांसाठी ६२ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ उमरगा तालुक्यात एक टँकर तर ६ गावांसाठी १३ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ कळंब तालुक्यातील १४ गावांसाठी १८ टँकर, ४० गावांसाठी ६४ अधिग्रहणे करण्यात आले आहेत़ वाशी तालुक्यातील १० गावांसाठी ९ टँकर व १५ गावांसाठी १७ अधिग्रहणे झाली आहेत़ तर परंडा तालुक्यातील ५ गावात पाच टँकर व दोन गावांसाठी २ अधिग्रहणे करण्यात आली आहेत़ अधिग्रहणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी इतर गावातही पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. (प्रतिनिधी)
आजवर झालेला पाऊस
यंदाच्या पावसाळ्यात परंडा तालुक्यात ४५ मिमी पाऊस झाल्याची नोंद शासनदफ्तरी आहे़ (कंसातील आकडेवारी गुरूवारच्या पावसाची) यात उस्मानाबाद तालुक्यात ३५़५ मिमी (७़८० मिमी), तुळजापूर तालुक्यात ३३़८ (१२़४०), उमरगा तालुक्यात २४़८ (९़४०), लोहारा तालुक्यात ३४़३ (१०़००), भूम तालुक्यात २६़८ (२़८०), कळंब तालुक्यात २८.३ (१़७०), परंडा तालुक्यात ४५ (00), वाशी तालुक्यात ३४ (३़७०) पाऊस झाला आहे़ जिल्ह्यात एकूण ३२़८१ (५़९७) मिमी पावसाची नोंद झाली आहे़