आत्महत्या रोखण्याची ३५० जणांनी घेतली शपथ
By Admin | Updated: December 28, 2014 01:14 IST2014-12-28T01:11:02+5:302014-12-28T01:14:36+5:30
अणदूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी अणदूर (ता़तुळजापूर) येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती़

आत्महत्या रोखण्याची ३५० जणांनी घेतली शपथ
अणदूर : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी अणदूर (ता़तुळजापूर) येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती़ यावेळी ३५० जणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची शपथ घेतली़
यावेळी बोलताना लातूर येथील मानसोपचार तज्ञ डॉ़ मिलिंद पोतदार यांनी आत्महत्या करणारा इसम काही दिवस अगोदर त्याच्या वर्तणुकीतून, बोलण्यातून वेगळे संकेत देत असतो़ ते संकेत ओळखून, त्याचा बदलता स्वभाव, हलचाली पाहून त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे़ संबंधितांचे योग्य प्रकारे समुपदेशन झाले तर तो इसम आत्महत्येपासून नक्कीच परावृत्त होवू शकतो, असे सांगितले.
तर अतुल देऊळगावकर यांनी शेतकऱ्यांनी संघटीत होवून गटशेती करण्यासह शासनाने शेती सुधारण्यासाठी करावयाच्या नियोजनावर मार्गदर्शन केले़ कार्यक्रमाचे अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांनी शेतकऱ्यांनी संघटीत होवून आपल्या मागण्यांसाठी आवाज उठविण्याची गरज व्यक्त केली़ तसेच सर्व वस्तूंचे दर ठरलेले आहेत़ त्याचप्रमाणे शेती मालाला हमीभाव देण्याची गरजही व्यक्त केली़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष डॉ़ शशीकांत अहंकारी यांनी केले़
दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमोद कांबळे यांनी नाटिका सादर केली़ तर कार्यक्रमस्थळी बांधण्यात आलेले दोन गळफास शेतकऱ्यांनी मशालीद्वारे जाळून आत्महत्या न करणे व इतरांना करू न देण्याची शपथ घेतली़ (वार्ताहर)