छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५ हजार कर्जदारांनी बुडवले तब्बल २४९ कोटींचे मुद्रा लोन
By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 3, 2024 19:55 IST2024-07-03T19:55:11+5:302024-07-03T19:55:32+5:30
मुद्रा लोनचे वाटप करण्यात राज्यात छत्रपती संभाजीनगर १२व्या स्थानावर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५ हजार कर्जदारांनी बुडवले तब्बल २४९ कोटींचे मुद्रा लोन
छत्रपती संभाजीनगर : सरकारने एखादी योजना आणली, तर तिचा फायदा घेणाऱ्यांपेक्षा गैरफायदा घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. बँकेतून कर्ज घेतले की, सरकार आज ना उद्या माफ करील, या गैरसमजुतीपोटी अनेक जण कर्जाची परतफेड करतच नाहीत. याचा अंतिम फटका त्या योजनेपासून वंचित राहिलेल्या व प्रामाणिक लोकांना बसतो. याचे ज्वलंत उदाहरण केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ आहे. या योजनेत ३५ हजार व्यावसायिकांना दिलेले २४९ कोटींचे कर्ज त्यांनी फेडलेलेच नाही.
६ एप्रिल २०१५ रोजी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ची सुरुवात झाली. कॉर्पाेरेट किंवा शेतीशी संबंधित नसलेल्या लहान आणि सूक्ष्म व्यवसायांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. त्याला ‘मुद्रा कर्ज’ असे म्हणतात.
शिशु ते तरुण कर्ज
व्यवसायवाढीसाठी ज्यांना आर्थिक साहाय्य आवश्यक आहे. त्या छोट्या व्यावसायिकांना भारत सरकार मुद्रा कर्ज देते. ही कर्जे व्यवसायाच्या टप्प्यांवर आणि आवश्यक कर्जाच्या रकमेवर आधारित तीन श्रेणींमध्ये वर्गीकृत आहेत.
शिशुकर्ज : यात नवीन व्यवसायासाठी ५० हजारांपर्यंत कर्ज मिळते.
किशोर कर्ज : यात ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज मिळते.
तरुण कर्ज : व्यवसायाचा विस्तार आणि वाढ करण्याच्या उद्देशाने ५ लाख ते १० लाख रुपयांदरम्यान कर्ज मिळते.
बँकांकडून १८५१ कोटींचे मुद्रा लोनचे वाटप २०१५ पासून बँकांनी मुद्रा लोन देण्यास सुरुवात केली. मागील नऊ वर्षांत बँकांनी २ लाख ७८ हजार १९० व्यावसायिकांना १८५१ कोटींच्या मुद्रा लोनचे वाटप करण्यात आले.
कितीजणांनी बुडवले कर्ज?
३५ हजार व्यावसायिकांनी २४९ कोटींचे कर्ज बुडवले आहे. कर्ज एनपीए राहण्याचे प्रमाण १३ टक्के आहे.
मागील आर्थिक वर्षात १४४३ कोटींचे कर्जवाटप
३१ मार्चअखेर जिल्ह्यात १ लाख ८८ हजार ७१५ व्यावसायिकांना १४४३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. मुद्रा लोनचे वाटप करण्यात राज्यात छत्रपती संभाजीनगर १२व्या स्थानावर तर मराठवाड्यात नांदेड पाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.
सर्वाधिक एनपीए
सुरुवातीच्या काळातील २०१५ ते २०१७ या काळात ज्या व्यावसायिकांनी मुद्रा लोन घेतले. त्यातील अनेक व्यावसायिकांनी त्याची परतफेड केली नाही. यामुळे ही खाती एनपीएमध्ये गेली आहेत. जुन्या मुद्रा कर्जाची नियमितपणे परतफेड केली की, त्यांना पुढील कर्ज मिळण्याची शक्यता आहे.
नियमित कर्ज फेडणाऱ्यांना २० लाखांपर्यंत मिळतेय कर्ज
मुद्रा कर्ज योजनेत आता सुसूत्रता आणण्यात आली आहे. ज्यांनी मुद्रा लोन घेऊन त्याची नियमित परतफेड करत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदारांसाठी कर्जमर्यादा २० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. कर्ज न फेडल्यास कर्जदाराच्या विकासाचे सर्व मार्ग बंद होतात. त्यांना पुन्हा बँका कर्ज देत नाहीत; यामुळे कर्जाची नियमित परतफेड करावी.
- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक