तीन वर्षांत ३ कोटींचे बिल;छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांच्या दुरूस्तीवर पाण्यासारखा पैसा खर्च!

By मुजीब देवणीकर | Published: April 11, 2024 06:39 PM2024-04-11T18:39:53+5:302024-04-11T18:40:24+5:30

जुन्या योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर केल्या जाणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

3 crore in three years; Chhatrapati Sambhaji Nagar spent money like water on the repair of old water pipelines | तीन वर्षांत ३ कोटींचे बिल;छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांच्या दुरूस्तीवर पाण्यासारखा पैसा खर्च!

तीन वर्षांत ३ कोटींचे बिल;छत्रपती संभाजीनगरात जलवाहिन्यांच्या दुरूस्तीवर पाण्यासारखा पैसा खर्च!

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविणाऱ्या ७०० आणि १,२०० मिमी. व्यासाच्या जलवाहिन्या अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. मागील ३ वर्षांमध्ये जलवाहिन्यांच्या दुरूस्तीवर २ कोटी ९७ लाख ३५ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. मनपा पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिन्यांच्या दुरूस्तीवर खर्च किती हे सांगण्यास वारंवार टाळाटाळ करण्यात येत होती. जलवाहिन्यांच्या दुरूस्तीवर पाण्यासारखा पैसा खर्च करूनही नागरिकांना समाधानकारक पाणी मिळायला तयार नाही, हे विशेष.

१९७२मध्ये शहरासाठी ७०० मिमी व्यासाची पहिली जलवाहिनी टाकली. या जलवाहिनीचे आयुष्य २० वर्षांपूर्वी संपले. त्यानंतर १९८२मध्ये १,२०० मिमी. व्यासाची जलवाहिनी टाकली. या जलवाहिनीचे आयुष्यही दहा वर्षांपूर्वी संपले. दोन्ही जलवाहिन्या हजारो ठिगळे लावून सुरू ठेवल्या आहेत. २००५ मध्ये शहरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकणे गरजेचे होते. मनपाकडून हे शक्य झाले नाही. आता २,७४० कोटी रुपये खर्च करून २,५०० मिमी. व्यासाची जलवाहिनी आणि २०५० पर्यंत पुरेल एवढे पाणी शहरात आणण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना पूर्ण होण्यासाठी २०२५ साल उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेला जुन्या ७०० व १,२०० मिलिमीटर व्यासाच्या पाणी योजनेवरच अवलंबून राहावे लागत आहे. या जलवाहिन्यांवर वारंवार बिघाड निर्माण होतो. कधी जलवाहिनी फुटते, तर कधी पंपहाउसमध्ये बिघाड होतो. परिणामी, शहरावरील पाणी संकट तीव्र होत आहे. त्यामुळे जुन्या योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर केल्या जाणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महापालिकेने तीन वर्षांत तब्बल २ कोटी ९७ लाख ३५ हजार २३५ रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.

कोणत्या वर्षी किती खर्च
माहितीच्या अधिकारात सुरज अजमेरा यांनी पाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च मागितला. त्यांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात १ कोटी ३३ लाख ७६ हजार २४५ रुपये, २१-२२ या वर्षात ९९ लाख ७६ हजार ६४८, तर २२-२३ या आर्थिक वर्षात ६३ लाख ८२ हजार २३२ रुपये खर्च करण्यात आला असल्याचे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

Web Title: 3 crore in three years; Chhatrapati Sambhaji Nagar spent money like water on the repair of old water pipelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.