मुखेड तालुक्यात २९२ ठिकाणचे पाणी दूषित
By Admin | Updated: May 28, 2014 00:41 IST2014-05-28T00:31:30+5:302014-05-28T00:41:42+5:30
किशोरसिंह चौहाण , मुखेड तालुक्यातील १२७ ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या २०५ गाव, वाडी, तांड्यांतील मान्सूनपूर्व पाणीस्त्रोत तपासणी करण्यात आली.

मुखेड तालुक्यात २९२ ठिकाणचे पाणी दूषित
किशोरसिंह चौहाण , मुखेड तालुक्यातील १२७ ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या २०५ गाव, वाडी, तांड्यांतील मान्सूनपूर्व पाणीस्त्रोत तपासणी करण्यात आली. शहरातील १७ वॉर्डातील १५१ पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यात आली. यात शहरातील १२ ठिकाणचे, ग्रामीण भागातील २९२ ठिकाणचे पाणी दूषित असल्याचे अनुजैविक पाणी तपासणीत पुढे आले आहे. मुखेड तालुक्यात पिण्याचे पाणी माणसाच्या आरोग्याचे शत्रू बनले आहे. दूषित पाणी सेवनाने ग्रामीण जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनस्तरावर ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असून अनेक योजना राबविण्यात येतात़ आरोग्य अबाधीत ठेवण्यासाठी राज्य व केंद्र शासन निर्मल ग्राम, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवून ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहे. पण ग्रामपंचायतस्तरावर ही योजना केवळ कागदावरच राबविली जात आहे. आजही ग्रामणी भागात ८० ते ८५ टक्के लोकांच्या घरात शौचालय नाहीत. अनेक जण उघड्यावर शौचास बसतात़ त्यामुळे हेच पाणी विहीरीत, बोअरमध्ये मिसळून दूषित होत आहे. प्रत्येक महिन्याला पाणी गुणवत्ता व स्वच्छता सर्वेक्षण केले जाते व ज्या गावांतील पाणी दूषित आहे त्या गावांचे सरपंच, ग्रामसेवकांना तपासणीत दूषित आढळलेल्या पाणीस्त्रोताची माहिती देवून त्या परिसरात स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात. पण याकडे लक्ष दिले जात नाही व सुधारणाही केली जात नाही. ग्रामीण भागात सार्वजनिक विहीर, बोअर, हातपंपाशेजारी पाण्याचे डबके साचल्याचे चित्र आहे. अनेक गावांतील महिला धुने धुतात व शेतकरी बैल धुतात. लहान मुले हातपंपांच्या शेजारी शौचास बसतात.यामुळे जमलेली घाण पाणी जमिनीत मुरत आहे. यामुळे पाणी दूषित होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. तालुक्यात ८५ टक्के सार्वजनिक पाणीपुरवठा करणारा परिसर अस्वच्छ असल्याचे आरोग्य कर्मचारी सांगतात. पण ज्यांच्याकडे पाणीपुरवठा करणार्या ठिकाणावर स्वच्छता अबाधीत ठेवण्याची जबाबदारी आहे. तेच याकडे दुर्लक्ष करतात व प्रशासनाकडे बोट दाखवतात. ग्रामीण भागातील पाणी तपासणीत विलंब होऊ नये म्हणून राज्य शासनाने तालुकास्तरावर अनैजीवक पाणी तपासणीसाठी प्रयोग शाळा उभा केली आहे. या प्रयोग शाळेतून प्रत्येक महिन्यात पाणी तपासणी केली जाते़ परंतु अनेक गावचे सरपंच व ग्रामसेवक या प्रयोगशाळेकडे गावातील पाणीस्त्रोत तपासणीसाठी फिरकतच नसल्याचे चित्र आकडेवारीवरुन दिसून येते. तालुक्यात सात प्राथमिक आरोग्य केंद्र असून बाºहाळी प्रा. आरोग्य केंद्रातंर्गत ३१ ग्रामपंचायतीसह ७५ वाडी, तांडे आहेत. येथील १०७ पाणीस्त्रोत मध्यम, ३८ सोम्य आहे. चांडोळा पीसी अंतर्गत १० ग्रामपंचायतींसह १३ वाडी, तांडे असून येथील पाणीस्त्रोत २१ तीव्र, १६ मध्यम, ८ सौम्य. सावरगाव प्रा. आ. केंद्रातंर्गत २२ ग्रामपंचायतीसह २५ वाडी, तांड्यांचा समावेश असून २ तीव्र, ७७ मध्यम, १० सौम्य आहे. राजूरा २४ ग्रा. पं. सह ३५ वाडी , तांडे, ६० मध्यम, ५९ सौम्य आहे. जांबय पाच ग्रापं. अंतर्गत ८ वाडी, तांडे, २ तीव्र, २४ मध्यम, ६ सौम्य. सावरमाळ २० ग्रामपंचायत अंर्गत ३० वाडी, तांडे, २७ मध्यम, ७९ सौम्य. बेटमोगरा (पीसी) १५ ग्रामपंचातअंर्गत १९ वाडी, तांडे, २ तीव्र, ५२ मध्यम २९ सौम्य जोखीम पाणीस्त्रोत आढळून आले आहेत. यात बेळी बु, जाहूरतांडा, जाहूर, मेथी, तूपदाळ, उंद्री (पदे), एकलारा, पिंपळकुंठा, पिंपळकुंठातांडा, बिल्लाळी, कबनूर, हसनाळ, कोळनूर, कुंद्राळा, थोरवाडी, पैसमाळ,सलगरा खुर्द, खंडगाव, होकर्णा, चांडोळा, चांडोळातांडा, भगनूरवाडी, तांदळी, जांब खुर्द, पांखडेवाडी, बेळी खुर्द, आडमाळवाडी, खैरका, बोमनाळी, शिकारा, पांडुर्णी, कोडग्याळ, मोहणातांडा, शिरुर (दबडे), आखरगा, बावनवाडी, जुन्ना, अंबुलगा, दापका (गुं) आदी गावचे पाणी दूषित आहे. शहरातील वडर गल्ली, वाल्मीकनगर, गायत्री गल्ली, शिवाजीनगर, विद्यानगर, टिळकनगर, कोळी गल्ली, लोखंडे चौक, विरभद्र गल्ली परिसरातील हातपंप, विद्युतपंपाचे पाणी दूषित आहे. तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीकडे टीसीएल पावडर उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे़ तालुक्यात १२७ गामपंचायतींअंतर्गत १५० वाडी, तांड्यांसह ६७८ हातपंप आहेत, ११० नळयोजना आहेत तर ६८ विहीर व ४४१ विद्युतंप आहेत. प्राथमिक आरोग्य विभाग व अनुजैविक पाणी तपासणी प्रयोग शाळेने तपासलेल्या वरील पाणीस्त्रोतामध्ये २९२ ठिकाणचे पाणी दूषित असून पिण्याच्या अयोग्य असल्याचा प्रकार समोर आला आहे.