उत्तराखंडमध्ये अडकलेले छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यातील २९ यात्रेकरू सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 16:39 IST2025-08-06T16:38:50+5:302025-08-06T16:39:29+5:30
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली.

उत्तराखंडमध्ये अडकलेले छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यातील २९ यात्रेकरू सुखरूप
छत्रपती संभाजीनगर/नांदेड : उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे ढगफुटी झाली असून, ज्यामुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. येथे छत्रपती संभाजीनगरमधील १८ आणि नांदेड जिल्ह्यातील ११ पर्यटक अडकले असून, ते सर्व सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १८, नांदेड जिल्ह्यातील ११ यांच्यासह इतर जिल्ह्यातील मिळून एकूण ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
नांदेडमधील ११ पर्यटक सुखरूप
बिलोली तालुक्यातील डोणगाव येथील ११ जण केदारनाथ बद्रीनाथ यात्रेसाठी १ ऑगस्ट रोजी नांदेड येथून निघाले होते. ते सर्व भूस्खलन झालेल्या स्थळापासून १५० किमी दूर असून सर्व ११ जण सुखरूप असल्याचे जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास सचिन पत्तेवार यांनी कळविले आहे. त्यांच्या समवेत शिवचंद्र सुकाळे, शिवा कुरे, स्वप्निल पत्तेवार, शिवा ढोबळे, धनंजय ढोबळे, नागनाथ मुंके, देवानंद गौण्डगे, अमोल कुरे, सोमनाथ चंदापुरे, देवानंद चंदापुरे हे सुरक्षित आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील १८ यात्रेकरू
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील १८ यात्रेकरू ३१ जुलै रोजी केदारनाथ यात्रेसाठी रवाना झाले. ते ४ तारखेला उत्तरकशी येथे पोहचले. तर दुसऱ्यादिवशी मंगळवारी ( दि. ५) धराली येथे ढगफुटी झाली तेव्हा सर्व प्रवासी तेथून १७ किमी दूर भैरव घाटी पाहण्यासाठी गेले होते. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. यात्रेकरुंमध्ये उज्वला बोर्डे, अरुण बोर्डे, ज्योती बोर्डे, भारती कुपटकर, प्रमिला दहिवाळ, शिवाजी दहिवाळ, शुभांगी शहाणे, किरण शहाणे, मंजू नागरे, संतोष कुपटकर, नुतन कुपटकर, शिवदत्त शहाणे, उषा नागरे, कल्पना बनसोड, नवज्योत थोरहत्ते, वेदांत थोरहत्ते, शितल थोरहत्ते आणि कृष्णा थोरहत्ते यांचा समावेश आहे.
राज्य सरकार उत्तरकाशी आपत्ती केंद्राच्या संपर्कात
उत्तराखंड मध्ये अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन तत्पर असून पर्यटकांची संपर्क करत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी संपर्क साधला जात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी महाराष्ट्र सदन, दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत. येथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून पुढील सूचना वेळोवेळी दिल्या जाणार असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.
संपर्क क्रमांक:
- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र : ९३२१५८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९
- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : ०१३५-२७१०३३४ / ८२१