मराठवाड्यातील २९ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येईना मराठी; इंग्रजी, गणितापासून तर चार हात लांबच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 10:08 IST2024-12-26T10:08:38+5:302024-12-26T10:08:52+5:30
विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण

मराठवाड्यातील २९ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येईना मराठी; इंग्रजी, गणितापासून तर चार हात लांबच
छत्रपती संभाजीनगर : केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असला तरी मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांतील जि.प. शाळांमधील २९ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब विभागीय प्रशासनाने केलेल्या एका पाहणीअंती उघडकीस आली आहे. लातूर व बीड या दोन जिल्ह्यांतील निष्कर्ष अद्याप समोर आलेले नाहीत. पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची साक्षरता व संख्याज्ञान अभियानांतर्गत पाहणी करण्यात आली. इंग्रजी, गणितापासून तर विद्यार्थी चार हात लांब असल्याचे आढळले. प्राथमिक शिक्षणाचा पायाच कच्चा असल्याचे यातून दिसते. धाराशिव जिल्ह्यातील भाषाज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. दुसरीतील ८६.८७, तर तिसरीतील ८७.५१ टक्के विद्यार्थ्यांना मोठी वाक्य वाचता येतात.
पाहणीतील निष्कर्ष
पहिलीतील १ लाख १६ हजार ७४१ विद्याथ्यापैकी ७७ हजार ३७० विद्यार्थी ४ ते ५ शब्द असलेले छोटी वाक्ये वाचतात. ३९ हजार ३७१ विद्यार्थ्यांना छोटी वाक्येदेखील वाचता येत नाहीत. हे प्रमाण ३३.७३ टक्के आहे.
दुसरीमधील १ लाख २३ हजार ८६१ विद्यार्थ्यांपैकी ८५ हजार विद्यार्थ्यांना ४० ते ५० शब्द असलेली वाक्य वाचता येतात, तर ३७ हजार ८९१ विद्यार्थ्यांना वाक्य वाचता येत नाहीत.
तिसरीमधील १ लाख ३२ हजार ३८५ विद्यार्थ्यांपैकी ९४ हजार ९३६ विद्यार्थ्यांना ६० शब्द असलेली वाक्य वाचता येतात, तर ३७ हजार ४३९ विद्यार्थ्यांना वाक्य वाचता येत नाहीत.
विद्यार्थ्यांची चाचणी
भाषाज्ञानासाठी पहिली ते तिसरीपर्यंतच्या ३ लाख ७२ हजार ९७७ विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. त्यात १ लाख १४ हजार ७०१ विद्यार्थ्यांना मराठीसह इतर भाषेची छोटी, मध्यम व मोठी वाक्य वाचता आलेली नाहीत. मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यात धाराशिव जिल्ह्यातील भाषाज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. पहिलीतील ८४.८९ टक्के, दुसरीतील ८६.८७, तर तिसरीतील ८७.५१ टक्के विद्यार्थ्यांना मोठी वाक्य वाचता येतात.