एटीएम पासवर्ड विचारून २५ हजारांची फसवणूक
By Admin | Updated: December 2, 2014 00:55 IST2014-12-02T00:55:24+5:302014-12-02T00:55:24+5:30
वाळूज महानगर : तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. मी बँकेचा कर्मचारी बोलतोय.

एटीएम पासवर्ड विचारून २५ हजारांची फसवणूक
वाळूज महानगर : तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. मी बँकेचा कर्मचारी बोलतोय. तुमच्या एटीएमचा पासवर्ड नंबर सांगा अशी थाप मारून भामट्याने नेट बँकिंगद्वारे एका कामगाराची २४६२० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे.
अरविंद दिगंबर इंगोले (रा. गंगोत्री पार्क, वडगाव कोल्हाटी) हे एका खाजगी कं पनीत कामाला असून त्यांचे कॉसमॉस बँकेत खाते आहे. ते आजोबा आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी नांदेड येथे गेले होते. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात असताना अरविंद इंगोले यांना २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०७ वाजता ९१७०७६५४०१२९ या मोबाईल क्रमांकावरून त्यांच्या ९१९६३७२५६५०६ या मोबाईल क्रमांकावर एका अनोळखी भामट्याने बँकेचा कर्मचारी बोलतोय असे सांगून इंगोले यांच्या एटीएम कार्डबद्दल चौकशी केली. इंगोले यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली असता भामट्याने तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते परत चालू करावयाचे असेल तर एटीएमवरील नंबर सांगा असे सांगितले. एटीएम बंद पडण्याच्या भीतीने इंगोले यांनी त्या भामट्यास एटीएम कार्डविषयी सर्व माहिती सांगितली. माहिती सांगितल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच इंगोले
यांच्या मोबाईल क्रमांकावर त्यांच्या खात्यावरील पैसे काढल्याचे
मेसेज यायला सुरुवात झाली. भामट्याने २४ हजार ६२० रुपये काढले आहेत.
या प्रकरणी इंगोले यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सायबर क्राईमकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला. अखेर इंगोले यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.