२३३ दांडीबहाद्दर तलाठ्यांना नोटीस
By Admin | Updated: June 25, 2014 01:04 IST2014-06-25T00:05:01+5:302014-06-25T01:04:09+5:30
बीड: जिल्हयातील ३७४ पैकी १०० तलाठी कार्यालयांचे ‘स्टींग’ टीम लोकमत ने २४ जूनच्या अंकातून प्रसिध्द केले़

२३३ दांडीबहाद्दर तलाठ्यांना नोटीस
बीड: जिल्हयातील ३७४ पैकी १०० तलाठी कार्यालयांचे ‘स्टींग’ टीम लोकमत ने २४ जूनच्या अंकातून प्रसिध्द केले़ तलाठी कार्यालयातील वास्तव महसूल अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले़ व बीड जिल्ह्यातील २३३ दांडी बहाद्दर तलाठ्यांना नोटिसा बजावून सज्जाच्या ठिकाणी हजर न राहिल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी तलाठ्यांना बजावण्यात आलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे़
‘टीम लोकमत’ ने तलाठी कार्यालयाचे ‘स्टींग’ केल्यानंतर जिल्हयातील तलाठी कार्यालयांची अवस्था जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली़ यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागाने तात्काळ जिल्ह्यातील २३३ तलाठ्यांना नोटिसा बजावल्या असल्याचे आस्थापना विभाग प्रमुख सुहास हजारे यांनी सांगितले़ आदेशानुसार तलाठ्यांनी सज्जाच्या ठिकाणीच मुक्कामी असले पाहिजे असा नियम आहे़ मात्र सज्जाच्या ठिकाणी रहाणे तर सोडा; काही तलाठी तर दोन-दोन महिने कार्यालयांकडे फिरकतच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले़ अनेक तलाठी कार्यालयातील अनागोंदी कारभाराच्या ‘क्लिप’ लोकमत कडे उपलब्ध आहेत़ आता तरी प्रशासन कारवाई करेल का? असा प्रश्न आता जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे़ (प्रतिनिधी)
केवळ नोटीस नको, कारवाई करा
तलाठी वेळेवर कार्यालयात येत नाहीत़ तहसील कार्यालयात गेल्यावर तेथे ही भेटत नाहीत़ हा प्रकार आजचा नाही़ यामुळे शाळेतील विद्यार्थ्यापासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचींच कामे खोळंबतात़ हा प्रकार मागील अनेक वर्षापासून सुरू असताना देखील प्रशासन केवळ दंडात्मक कारवाई ची नोटीस देते़ आता दांडी बहाद्दर तलाठ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंगणी बु. चे सरपंच अंकुश गोरे यांनी केली.
कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय नाही
जिल्ह्यातील तलाठी सज्जावर वेळेवर येत नाहीत़ सज्जाच्या ठिकाणी राहत नाहीत़ याबाबत सखोल चौकशी केली जाईल़ एवढेच नाही तर मी जिल्ह्यातील सज्जांना अचानक भेटी देखील देणार आहे़ चुकीचे आढळून आल्यास तात्काळ संबधीत तलाठ्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.