पहलगामधून वैष्णोदेवीकडे गेल्याने बचावले छत्रपती संभाजीनगरचे २२ जण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 19:24 IST2025-04-24T19:22:41+5:302025-04-24T19:24:44+5:30
तणाव आणि भीतीचे वातावरण; काश्मीरमधील ‘पिकनिक स्पॉट्स’वर सन्नाटा

पहलगामधून वैष्णोदेवीकडे गेल्याने बचावले छत्रपती संभाजीनगरचे २२ जण
छत्रपती संभाजीनगर : जम्मू- काश्मीरमधील पहलगाममधून वैष्णोदेवीकडे प्रस्थान केल्याने, तर काहींनी पहलगामकडे जाण्याऐवजी ट्यूलिप गार्डन पाहण्याचा निर्णय घेतल्याने सुखरूप राहिल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
हल्ल्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर शहरातील २२ जण पहलगामध्ये होते; परंतु सुदैवाने सकाळी ६ वाजता ते वैष्णोदेवी दर्शनानासाठी रवाना झाले. एका यात्रा कंपनीमार्फत ते सहलीवर गेले आहेत. ते सर्व सुखरूप असल्याची माहिती आहे. २२ रोजी पावसामुळे पहलगामला जाण्याचा निर्णय बदलला आणि ट्यूलिप गार्डन पाहिले. त्यामुळे आम्ही वाचलो. श्रीनगरला थांबलो आहोत, असे उल्कानगरीतील भास्कर डांगे यांनी सांगितले. सगळे पर्यटक परतीच्या प्रवासासाठी तयारी करीत असून, तेथील पिकनिक स्पॉटवर सध्या सन्नाटा असल्याची माहिती पर्यटकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अनेक जण हॉटेलमध्ये थांबले आहेत. पहलगामपासून शेकडो कि.मी. अंतरावर जरी असलो तरी भय वाटत आहे. पिकनिक स्पॉटवरील वर्दळ कमी झाल्याचे अनेकांनी सांगितले. दरम्यान, विभागीय प्रशासनाने विभागातील सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती संकलनाच्या सूचना दिल्या, तसेच सर्व जिल्ह्यांना श्रीनगर येथील विभागीय आयुक्तालयाने सुरू केलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संपर्क क्रमांकही दिल्यानंतर पर्यटकांची माहिती प्रशासनाकडे येत आहे. मराठवाड्यातून जम्मू- काश्मीरला शेकडो पर्यटक गेल्याचा अंदाज आहे.
परतीसाठी प्रयत्न...
दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही दोघेही अलीकडच्या परिसरात होतो. सध्या आम्ही घटनास्थळापासून शंभर किलोमीटरवर श्रीनगर येथे सुखरूप आहोत. बाकीचा दौरा रद्द करून लवकर परतीचा प्रयत्न करत आहोत.
- मोहन पारगावकर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर
मराठवाड्यातील हे पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये...
राजूर, भोकरदन येथील संदीप साबळे, तेजस्विनी साबळे त्यांचा पाच वर्षीय मुलगा कौस्तुभ साबळेसह काश्मीरला गेले असून, ते मंगळवारी पहलगाममधील हॉटेलमध्ये सुखरूप होते, बुधवारी स्थानिक पोलिस विभागाची परवानगी घेऊन ते श्रीनगरकडे निघाले. जालना शहरातील संजय राऊत, सोनल राऊत व आदर्श राऊत हे श्रीनगरमधील हॉटेलात सुखरूप आहेत. जालन्यातील समर्थनगर येथील डॉ. विठ्ठल गाडेकर, वर्षा गाडेकर हे श्रीनगरला सुखरूप आहेत. धाराशिव येथील अतुल पाटील, त्यांची पत्नी व दोन मुले, असे ४ जण श्रीनगरमध्ये सुखरूप आहेत. हिंगोलीतील अग्रवाल दाम्पत्याने त्या भागातील परिस्थिती लक्षात घेऊन श्रीनगरमध्येच मुक्कामी थांबण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोलीतील शास्त्रीनगर भागातील व्यापारी शुभम अग्रवाल, पत्नी रचना अग्रवाल श्रीनगर येथे मुक्कामी असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
सतर्कतेच्या सूचना...
मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
- खुशालसिंग परदेशी, विभागीय अप्पर आयुक्त
निर्णय बदलला आणि वाचलो...
२२ रोजी पावसामुळे पहलगामला जाण्याचा निर्णय बदलला आणि टूलिप गार्डन पाहिले. त्यामुळे आम्ही वाचलो आहोत. सध्या सुखरूप असून, श्रीनगरला थांबलो आहोत. थोडे फार भीतीचे वातावरण आहे. आम्ही चौघे नाशिकहून जम्मू-काश्मीरला आलो आहोत.
- भास्कर डांगे, उल्कानगरी