मुलाच्या फीचे २० हजार पळविले!

By Admin | Updated: July 14, 2014 01:05 IST2014-07-14T00:54:07+5:302014-07-14T01:05:14+5:30

औरंगाबाद : शहरात थापाड्यांचा धुमाकूळ थांबण्यास तयार नाही. शनिवारीही एका थापाड्याने पोलीस असल्याची थाप मारत अजबनगर भागातून शेतकऱ्याचे वीस हजार रुपये लुटून नेले.

20 thousand children's fee is paid! | मुलाच्या फीचे २० हजार पळविले!

मुलाच्या फीचे २० हजार पळविले!

औरंगाबाद : शहरात थापाड्यांचा धुमाकूळ थांबण्यास तयार नाही. शनिवारीही एका थापाड्याने पोलीस असल्याची थाप मारत अजबनगर भागातून शेतकऱ्याचे वीस हजार रुपये लुटून नेले. औरंगाबादेत शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलांची फी भरण्यासाठी या शेतकऱ्याने उसनेपासने करून ही रक्कम आणली होती.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार येथील साईनाथ दामोधर दिवटे (४५) यांचा मुलगा आणि मुलगी औरंगाबादेत सध्या शिक्षण घेत आहे. मुलाच्या सीईटीच्या ट्यूशनची फी भरायची होती आणि मुलीला खर्चासाठी पैसे हवे होते. त्यामुळे दिवटे यांनी गावातून लोकांकडून उसनेपासने घेऊन साडेएकवीस हजार रुपये जमा केले. पैैसे घेऊन ते काल औरंगाबादला आले.
मुलगा उस्मानपुरा भागातील हॉस्टेलमध्ये राहतो. ते हॉस्टेलला गेले. तेव्हा फी पुढच्या महिन्यात भरली तरी चालेल, असे मुलाने सांगितले. त्यामुळे मुलाशी काहीवेळ बोलल्यानंतर ते उस्मानपुऱ्यातून पायी पैठणगेटला मुलगी राहत असलेल्या हॉस्टेलवर आले. मुलीची भेट घेतली. तिला खर्चासाठी दीड हजार रुपये दिले आणि मग ते परतीच्या मार्गाला लागले. गावी जाण्यासाठी दिवटे पैठणगेटहून अजबनगरमार्गे क्रांतीचौकाकडे पायी जात होते. अचानक पाठीमागून एक अनोळखी इसम आला. ‘मी पोलीस आहे. तुझ्या खिशात गुटख्याच्या पुड्या आहेत. या पुड्यांवर बंदी आहे, माहीत नाही का?’ असे म्हणत त्या इसमाने दिवटे यांची झडती घेणे सुरू केले.
झडती घेताना त्याने पाकीट काढले. त्या पाकिटात दिवटे यांनी मुलाच्या फीसाठी आणलेले २० हजार रुपये ठेवलेले होते. त्या इसमाने झडतीचा बहाणा करीत हातचालाखीने ते पैसे काढून घेतले आणि रिकामे पाकीट दिवटे यांच्या खिशात टाकून ‘चल नीघ, काहीच नाही तुझ्याकडे, आता मागे वळूनही बघू नकोस, नाही तर आत टाकील,’ अशी धमकी दिली. घाबरलेले दिवटे सरळ पुढे निघाले. काही अंतर पुढे आल्यानंतर त्यांनी पाकीट काढून पाहिले असता त्यातील २० हजार रुपयेही गायब होते. भामट्याने आपल्याला गंडविले, असे लक्षात आल्यानंतर दिवटे यांनी क्रांतीचौक ठाणे गाठून फिर्याद दिली. तपास जमादार व्ही.एस. शिंदे करीत आहेत.

Web Title: 20 thousand children's fee is paid!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.