नियमांकडे दुर्लक्ष भोवले; २० कृषी सेवा केंद्रांना ‘स्टॉप सेल’च्या नाेटीस
By बापू सोळुंके | Updated: June 10, 2023 19:24 IST2023-06-10T19:24:51+5:302023-06-10T19:24:59+5:30
एकाही शेतकऱ्याचे आर्थिक शोषण होऊ नये, यासाठी परवानाधारक कृषी सेवा केंद्रचालकांसाठी कृषी विभागाने नियम घालून दिले आहेत.

नियमांकडे दुर्लक्ष भोवले; २० कृषी सेवा केंद्रांना ‘स्टॉप सेल’च्या नाेटीस
औरंगाबाद : मृग नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशक खरेदीची लगबग सुरू केली आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते विक्री केल्याचे अद्ययावत रेकॉर्ड ठेवण्यास टाळाटाळ करणाऱ्या २० कृषी सेवा केंद्रांना तीन आठवडे माल विक्री थांबविण्याच्या (स्टॉप सेल)च्या नोटीस कृषी विभागाने बजावल्या.
बियाणे, खते आणि कीटकनाशकाची शेतकऱ्यांना नियमानुसार विक्री करावी. एकाही शेतकऱ्याचे आर्थिक शोषण होऊ नये, यासाठी परवानाधारक कृषी सेवा केंद्रचालकांसाठी कृषी विभागाने नियम घालून दिले आहेत. या नियमानुसार खते आणि बियाणे विक्री करताना शेतकऱ्यांना पावती देणे, दुकानात उपलब्ध असलेल्या खतांची माहिती देणारा बोर्ड दर्शनी ठिकाणी लावावा, कृत्रिम टंचाई करून शेतकऱ्यांना जादा दराने माल विक्री करू नये, विक्री केलेल्या बियाणे आणि खताची नोंद रजिस्टरमध्ये करणे, ई-पॉसमध्ये खत विक्रीची नोंद करणे दुकानदाराला बंधनकारक आहे.
कृषी सेवा केंद्रचालक नियमांचे पालन करतात अथवा नाही, तसेच शेतकऱ्यांना बियाणे आणि खत विक्री करताना अडवणूक करतात का? याबाबतची पडताळणी करण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना केली आहे. या सोबतच तालुका कृषी अधिकारी, पंचायत तालुका कृषी अधिकारी यांनाही अचानक कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अंतर्गत दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीत २० कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे आणि खत विक्रीचे रेकॉर्ड ठेवले नसल्याचे आढळले. त्यामुळे या कृषी सेवा केंद्र चालकांना जिल्हा कृषी अधीक्षकांच्या निर्देशाने नोटीस बजावण्यात आल्या. तीन आठवडे हे दुकानदार त्यांच्याकडील मालाची विक्री करू शकणार नाहीत. ऐन हंगामात कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या या कारवाईने कृषी सेवा केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे.
दोन दुकानांचे परवाने होणार निलंबित
जिल्ह्यातील दोन दुकानदारांना ऑफलाइन खत विक्री करणे महागात पडले आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार कृषी सेवा केंद्र चालकांना खत विक्री करण्यासाठी ई-पॉस मशिन देण्यात आले आहे. या मशिनमध्ये नोंद केल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या आधारकार्डची नोंद करूनच त्यांना खत विक्री करणे गरजेचे आहे. मात्र, दोन दुकानदारांनी ऑफलाइन खत विक्री केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई कृषी विभागाने सुरू केली आहे.