राज्यभर २ लाखांवर लायसन्सची छपाई प्रलंबित; मेसेज दाखवायची वेळ, वाहनचालक त्रस्त
By संतोष हिरेमठ | Updated: September 26, 2023 18:53 IST2023-09-26T18:52:35+5:302023-09-26T18:53:18+5:30
माहिती अधिकारातून उघड, लायसन्स कधी मिळेल? रस्त्यावर पोलिस मामा पकडतात हो!

राज्यभर २ लाखांवर लायसन्सची छपाई प्रलंबित; मेसेज दाखवायची वेळ, वाहनचालक त्रस्त
छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात टेस्ट दिली आणि पासही झाले. तरीही राज्यभरातील दोन लाखांवर वाहनधारकांना लायसन्सची प्रतीक्षाच करावी लागत आहे. कारण लायसन्सची छपाईच प्रलंबित असल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आले. लायसन्स कधी मिळेल, रस्त्यावर वाहतूक पोलिस पकडतात, असे म्हणत दररोज अनेक जण राज्यभरातील आरटीओ कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.
नव्या रूपातील वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) आणि वाहन परवान्याच्या (लायसन्स) छपाईला ऑगस्टमध्ये सुरुवात झाली आहे. नव्या रूपातील लायसन्स, ‘आरसी’वर ‘चीप’ऐवजी बारकोड पाहायला मिळत आहे. नव्या रूपातील आरसी, लायसन्स वाटपास जुलैपासून सुरुवात होणार होती; परंतु, जवळपास दीड महिन्यानंतर अखेर त्याची सुरुवात झाली. परिणामी, राज्यभरात हजारो वाहनचालकांना लायसन्ससाठी नुसती प्रतीक्षा करण्याची वेळ ओढावत असल्याची परिस्थिती आहे.
महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचे उपाध्यक्ष विठ्ठल मेहता यांनी लायसन्सच्या छपाईच्या परिस्थितीविषयी माहिती अधिकारात विचारणा केली होती. त्यांना दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात माहिती देण्यात आली. दाेन लाख ९८ हजार ६७२ इतक्या लायसन्सची छपाई प्रलंबित असून, नव्या सेवापुरवठादारामार्फत छपाईचे काम सुरू करण्यात आले, अशी माहिती त्यांना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.
मोबाइलवरचा मेसेज दाखविण्याची वेळ
लायसन्स मंजूर झाल्यानंतर वाहनचालकाला मोबाइलवर मेसेज पाठविला जातो. वाहतूक पोलिसांनी लायसन्सची विचारणा केली तर मोबाइलवरील मेसेज दाखवून दंडापासून सुटका करून घेण्याची वेळ वाहनचालकांवर ओढावत आहे.
वेळेवर लायसन्स मिळावे
लायसन्स ॲप्रूव्हल झाल्यानंतर ठरावीक कालावधीत आणि वेळेवर ते मिळणे, हा उमेदवारांचा हक्क आहे. माहितीच्या अधिकारातून राज्यात दाेन लाख ९८ हजारांवर लायसन्सची छपाई प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.
-विठ्ठल मेहता, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना