अतिसाराने १८ टक्के बालमृत्यू

By Admin | Updated: July 29, 2014 01:08 IST2014-07-28T23:58:12+5:302014-07-29T01:08:11+5:30

बीड : जिल्ह्यामध्ये अतिसारामुळे सुमारे १८ टक्के बालकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़

18 percent of child deaths due to diarrhea | अतिसाराने १८ टक्के बालमृत्यू

अतिसाराने १८ टक्के बालमृत्यू

बीड : जिल्ह्यामध्ये अतिसारामुळे सुमारे १८ टक्के बालकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ बालमृत्यू टाळण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे़ जवळपास चार लाख कुटुंबामध्ये जाऊन जनजागृती केली जाणार आहे़
२८ जुलै ते ८ आॅगस्ट २०१४ या कालावधीत दोन टप्प्यांमध्ये अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे़ त्यामध्ये अतिसारामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी जनजागृती केली जाणार असून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार आहे़ अतिसारामुळे जिल्ह्यातील १८ टक्के बालके मृत्यूमुखी पडतात़ त्यामुळे ही मोहीम अधिक जोमाने राबविण्याकडे आरोग्य विभागाचा कल आहे़ हे अभियान केंद्र सरकारचे असून जिल्ह्यातील पावणेतीन हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे़
दुसऱ्या टप्प्यामध्ये उपाययोजनांची अंमलबजावणी होणार आहे़ या अभियानाच्या माध्यमातून बालमृत्यूला आळा घालण्यास मदत होईल़ स्तनपान, आहार, स्वच्छता या मूलभूत बाबी कुटुंबातील सदस्यांना समजावून सांगण्यात येणार आहेत़ मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ गोवर्धन डोईफोडे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली़
अतिसाराची कारणे
० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना रोटा नावाच्या विषाणंूमुळे अतिसार होण्याची दाट शक्यता असते़ असंतुलित आहार, अस्वच्छता, कुपोषण, स्तनपानाकडे दुर्लक्ष यामुळे अतिसार होऊ शकतो, अशी माहिती जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांनी दिली़ (प्रतिनिधी)
काय आहे मोहीम ?
अतिसार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृती मोहीम होत आहे़
जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा, आरोग्य सेवक-सेविका यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे़
ओआरएस, झिंक गोळीबाबत माहिती दिली जाणार आहे़
प्रशिक्षणानंतर अधिकारी-कर्मचारी चार लाख घरांमध्ये भेटी देणार आहेत़
यावेळी पाच वर्षाखालील बालकांचा आहार कसा असावा, स्तनपान, सहा महिन्यानंतर वरचा आहार, बालकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी घ्यावयाची काळजी याची माहिती दिली जाणार आहे़
अतिसार आढळल्यास जागेवरच उपचार करण्यात येणार आहेत़

Web Title: 18 percent of child deaths due to diarrhea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.