छत्रपती संभाजीनगरातील कोकणवाडी चौक ते देवगिरी महाविद्यालयापर्यंतची १७ दुकाने भुईसपाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:42 IST2025-12-11T19:42:32+5:302025-12-11T19:42:57+5:30
फूटपाथवर वर्षानुवर्षे अतिक्रमण; वाहतूक कोंडीचा विद्यार्थी, नागरिकांना त्रास

छत्रपती संभाजीनगरातील कोकणवाडी चौक ते देवगिरी महाविद्यालयापर्यंतची १७ दुकाने भुईसपाट
छत्रपती संभाजीनगर : कोकणवाडी चौक परिसरातील जैस्वाल भवन ते देवगिरी महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्यावरील फूटपाथ काही व्यापाऱ्यांनी गायब केला होता. त्यामुळे वाहनधारकांना बराच त्रास सहन करावा लागत होता. बुधवारी दुपारी तीन वाजता अचानक महापालिकेने या ठिकाणी कारवाईचा बडगा उगारत तब्बल १७ दुकाने जमीनदोस्त केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
रस्ता रुंदीकरण मोहीम थांबलेली नाही, पोलिस बंदोबस्त आणि परिस्थितीनुसार अधूनमधून सुरूच राहील, असे महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे. वाहतुकीला अडथळा ठरत असणारी अतिक्रमणे सातत्याने काढण्यात येतील, असेही सांगितलेले आहे. कोकणवाडी चौकापासून देवगिरी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या छोट्या रस्त्यावरील फूटपाथवर अनेक वर्षांपासूनची अतिक्रमणे होती. छोटी हॉटेल, गॅरेज, आदी. अनेक प्रकारची दुकाने या ठिकाणी थाटण्यात आली होती. महाविद्यालय प्रशासनासह विविध शासकीय कार्यालयांनीही रस्त्यावरील वाहतूक कोंडीची तक्रार महापालिकेकडे केली होती.
बुधवारी दुपारी अचानक अतिक्रमण हटाव पथकाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे या ठिकाणी दाखल झाले. सुरुवातीला पथकाने व्यापाऱ्यांना सामान काढून घेण्याचे आवाहन केले. काही व्यापाऱ्यांचे सामान जास्त असल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच सामान काढून देण्यास मदत केली. सामान काढल्यानंतर लोखंडी पत्र्याची १७ दुकाने हटविण्यात आली. एका मोठ्या गॅरेजची भिंत रस्त्यात येत होती. ही भिंतही पाडण्यात आली. ही कारवाई अतिक्रमण हटाव पथकातील सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ व नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.