औरंगाबाद परिमंडळात दोन महिन्यांत पकडली १६०९ ग्राहकांची वीजचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:57 IST2018-06-27T15:56:40+5:302018-06-27T15:57:46+5:30
महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे.

औरंगाबाद परिमंडळात दोन महिन्यांत पकडली १६०९ ग्राहकांची वीजचोरी
औरंगाबाद : महावितरणच्या परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत लघुदाब वीज ग्राहकांकडे ३४४ कोटी ७९ लाख ३० हजार रुपये एवढी थकबाकी वाढली आहे. तथापि, थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे.
या संदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद शहर मंडळांतर्गत २२१ ग्राहकांनी केलेली वीजचोरी उघडकीस आली, तर ग्रामीण मंडळांतर्गत १२०२ वीज चोऱ्या उघडकीस आल्या. जालना एक आणि दोन मंडळांतर्गत १८९ वीज चोऱ्या पकडण्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांना यश आले. वीजचोरी पकडलेल्या ग्राहकांकडे १ कोटी २८ लाख ६० हजार रुपये बिलाची थकबाकी आहे. अधिकाऱ्यांनी वीज चोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच यापैकी २३१ जणांनी थकबाकी व दंडाची रक्कम भरण्याची तयारी दाखविली. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून १९ लाख ४३ हजार रुपये बिल व दंडाची रक्कम वसूल केली. तथापि, ६३ वीज चोरांविरुद्ध औरंगाबादेतील ५ आणि जालन्यातील ३ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
यापूर्वी औरंगाबाद परिमंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यांतील वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी जालना येथे एकच पोलीस ठाणे होते. अधिकारी वीज चोरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यास त्याठिकाणी दिवसभर ताटकळत बसावे लागत होते. त्यामुळे एप्रिल २०१८ पासून वीज चोरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत छावणी आणि सिडको पोलीस ठाणे, तर ग्रामीणमध्ये चिकलठाणा, सिल्लोड आणि गंगापूर अशी पाच पोलीस ठाणे देण्यात आले, तर जालना जिल्ह्यासाठी सदर बाजार पोलीस ठाणे, भोकरदन पोलीस ठाणे आणि परतूर पोलीस ठाणे देण्यात आले आहेत, या दोन जिल्ह्यांमध्ये यावेळी पहिल्यांदाच वीज चोरांविरुद्ध ६३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोहीम अधिक गतिमान करणार
यासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, एप्रिल व मे महिन्यांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली आहे. ती वसूल करणे व वीज चोरांविरुद्ध मोहीम गतिमान करण्यासाठी पथके तैनात केली जाणार आहेत. ३० जून रोजी या पथकांचे आदेश काढले जातील. पुढील महिन्यापासून सुरुवातीला १ ते १० तारखेपर्यंत वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविली जाईल, तर उर्वरित दिवसांमध्ये ही पथके थकबाकी वसुली करतील.