१६ कोटींचे कर्ज थकले, भगवान शिक्षण प्रसारक मंडळावर जप्तीची कारवाई
By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 25, 2023 19:12 IST2023-11-25T19:11:19+5:302023-11-25T19:12:10+5:30
बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे १६ कोटींचे कर्ज थकविले

१६ कोटींचे कर्ज थकले, भगवान शिक्षण प्रसारक मंडळावर जप्तीची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजीव खेडकर यांनी व्यवसायवाढीसाठी ९ वर्षांपूर्वी घेतलेले १६ कोटींचे कर्ज फेडले नाही. यामुळे बुलढाणा अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडने जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. मंडळाच्या सिडकोतील इमारतीतील टीव्ही, फ्रीज, खुर्च्या जप्त करण्यात आल्या.
जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार बेलिफ एस. डी. काकस व एस. बी. मुंढे यांनी सिडको एन-६ येथील भगवान शिक्षण प्रसारक मंडळाची जंगम मालमत्ता जप्त केली. कर्मचाऱ्यांना खुर्च्या नसल्याने सर्वजण दिवसभर उभे होते. यासंदर्भात बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे वकील ॲड. वैभव देशमुख यांनी सांगितले की, कर्ज थकीत झाल्याने बुलढाणा अर्बनने बुलढाणा येथील लवाद न्यायालयात प्रकरण दाखल केले. लवादाच्या आदेशानुसार १५ कोटी ९० लाख २३ हजार ९९ रुपये व भविष्यात होणाऱ्या व्याजासह रक्कम भरण्याचे आदेश दिले. मात्र, मंडळाने काहीच हालचाल केली नाही. यामुळे बुलढाणा अर्बनने जिल्हा न्यायालयात ९ सप्टेंबर २०२१ ला अंमलबजावणी आदेश याचिका दाखल केली. जिल्हा न्यायालयाने जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश १६ सप्टेंबर २०२३ ला दिले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यात २ लाखांच्या आसपास साहित्य जप्त केले. यावेळी बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक रमेश मुळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी हजर होते.
...तर स्थावर मालमत्ता जप्तीची होईल कारवाई
बेलिफ एस. डी. काकस व एस. बी. मुंढे यांनी सांगितले की, थकीत कर्जाची रक्कम भरली नाही तर जप्त केलेली जंगम मालमत्ता न्यायालयात दाखल करण्यात येईल. तरीही कर्जाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली तर न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार स्थावर मालमत्ता जप्त करून विक्री करण्यात येईल.
तडजोड सुरू आहे
भगवान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वकिलांनी सांगितले की, जंगम मालमत्ता जप्ती झाली आहे. मात्र, थकीत कर्ज भरण्यासंदर्भात आमची बोलणी सुरू आहेत. कारवाई टाळली जाईल. यामुळे वर्तमानपत्रांनी कोणतीही बातमी लावू नये.