शाळेबाहेर १५ वर्षीय मुलीला अडवले; ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशीच प्रेमवीराची जेलमध्ये रवानगी

By सुमित डोळे | Published: February 15, 2024 07:33 PM2024-02-15T19:33:01+5:302024-02-15T19:37:36+5:30

आईची तक्रार, पोलिसांकडून अटक, न्यायालयाकडून कारागृहात रवानगी

15-year-old girl stopped outside school; lover boy was sent to jail on the day of 'Valentine's Day' | शाळेबाहेर १५ वर्षीय मुलीला अडवले; ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशीच प्रेमवीराची जेलमध्ये रवानगी

शाळेबाहेर १५ वर्षीय मुलीला अडवले; ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशीच प्रेमवीराची जेलमध्ये रवानगी

छत्रपती संभाजीनगर : बुधवारी सर्वत्र प्रेममय वातावरणात व्हॅलेंटाइन डे साजरा होत असताना दुसरीकडे अल्लड वयातील प्रेमापोटी १८ वर्षांच्या तरुणावर थेट कारागृहात जाण्याची वेळ आली. ओळखीतल्याच १५ वर्षांच्या मुलीसोबत शाळेबाहेरच बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेमक्या त्याच वेळी तरुणीच्या आईने हा प्रकार पाहिला आणि संतप्त पालकांनी त्याला पकडून थेट ठाण्यातच नेले. सिडको पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून याप्रकरणी राहुल दीपक चव्हाण (१८, रा. जटवाडा) याच्यावर विनयभंग, बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अटक केली.

फेब्रुवारी महिना सुरू होताच तरुणाईला व्हॅलेंटाइन डे चे वेध लागतात. प्रेमवीरांमध्ये १४ फेब्रुवारीला अनन्यसाधारण महत्त्व असते. रोझ डे ते किस डे असा सप्ताहच यादरम्यान साजरा केला जातो. आवडणाऱ्या व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेक जण या दिवसाची वाट पाहतात. परंतु, प्रेमाच्या या सप्ताहात अल्पवयीन मुलीसोबत बोलण्याचा हट्ट राहुलला चांगलाच महागात पडला. १५ वर्षीय राखी (नाव बदलले आहे) एन-११ मधील एका नामांकित शाळेत शिकते. जटवाड्यात नातेवाइकाकडे ये-जा असल्याने राहुलने तिला तेथे पाहिले होते. १३ जानेवारी रोजी त्याने थेट राखीची शाळा गाठली. सकाळी ११:०० वाजता शाळा सुटल्यानंतर राखी बाहेर येताच राहुलने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेथेच राखीची आई तिला घरी घेऊन जाण्यासाठी उभी होती. राहुल बोलण्यासाठी हात पकडून बळजबरी करत असल्याचे दिसताच आईने धाव घेत त्याला ढकलले.

मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करताच राहुलने मला मारहाणीचा प्रयत्न केल्याचा आरोप राखीच्या आईने केला. शिवाय, राहुल गेल्या १ महिन्यापासून मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. संतप्त आईने सिडको पोलिस ठाणे गाठत राहुलविरोधात तक्रार दिली. तक्रार दाखल होताच निरीक्षक गीता बागवडे यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे यांनी राहुलला अटक केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. राहुल पदवीच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे.

Web Title: 15-year-old girl stopped outside school; lover boy was sent to jail on the day of 'Valentine's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.