बीड बायपासवर दुसऱ्या दिवशीही १४४ अतिक्रमणे भुईसपाट; अनधिकृत कब्जेदार हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:40 IST2025-06-05T16:34:06+5:302025-06-05T16:40:02+5:30

व्यापाऱ्यांनी उभारलेले शेड, पायऱ्या, संरक्षण भिंती, मिनी गार्डनवर टाच

144 encroachments on Beed bypass on second day; Unauthorized occupants taken into custody | बीड बायपासवर दुसऱ्या दिवशीही १४४ अतिक्रमणे भुईसपाट; अनधिकृत कब्जेदार हवालदिल

बीड बायपासवर दुसऱ्या दिवशीही १४४ अतिक्रमणे भुईसपाट; अनधिकृत कब्जेदार हवालदिल

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास रोडवर ‘साईड मार्जिन’मध्ये ‘सर्व्हिस रोड’ प्रस्तावित आहे. महापालिकेने मागील अनेक वर्षांपासून याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांनी त्यावर अतिक्रमणे केली. मंगळवारपासून या भागात अतिक्रमण हटाव माेहीम राबविण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी ११८ अतिक्रमणांवर कारवाई केली. बुधवारी दुसऱ्या दिवशी तब्बल १४४ अतिक्रमणे जमीनदोस्त केली. त्यामुळे या भागातील व्यापारी हवालदिल आहेत.

मार्च २०१९ मध्येही महापालिकेने बीड बायपासवर सर्व्हिस रोडच्या नावाखाली मोठी मोहीम राबविली होती. ही मोहीम जवळपास एक महिना सुरू हाेती. मोठ-मोठ्या इमारतींचा भाग या कारवाईत पाडण्यात आला होता. पण नंतर सहा वर्षांत मनपाने सर्व्हिस रोडच्या जागेचे काय झाले, हे पाहिले नाही. ३ जूनपासून पुन्हा या भागात कारवाई सुरू केली. पहिल्या दिवशी देवळाई चौकाच्या उत्तर बाजूने कारवाई केली. बुधवारी सकाळपासून दक्षिण दिशेला म्हणजेच बजाज हॉस्पिटलकडील भागात कारवाईला सुरुवात केली. प्रारंभी सामान काढून घेण्यासाठी व्यापाऱ्यांना वेळ देण्यात आला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत बजाज हॉस्पिटलपर्यंत कारवाई करण्यात आली. काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर लोखंडी अँगल लावून जागा व्यापली होती. एका हॉटेल व्यावसायिकाने मिनी गार्डन तयार केले. छोटे-छोटे तात्पुरते शेड उभारण्यात आले होते. ही कारवाई सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त भरत भिरारे, राहुल जाधव, अर्जुन गिराम, नगररचना विभागाचे अभियंता शिवाजी लोखंडे आदींनी केली.

२० फुटांचे होर्डिंग
या भागातील पेट्रोल पंपासमोर २० फूट रुंद अनधिकृत होर्डिंग उभारण्यात आले होते. महापालिकेने हे अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त केले. संबधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरू करण्यात आली. जमीनदोस्त केलेल्या होर्डिंगमध्ये साडेतीन टन लोखंड होते. सर्व लोखंडी अँगल तोडण्यात आले. या कारवाईत मनपाचे दोन कर्मचारी जखमी झाले. गणेश राजपूत, शेख वाजेद अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Web Title: 144 encroachments on Beed bypass on second day; Unauthorized occupants taken into custody