दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर; जिल्ह्यातील ४४० केंद्रांवर पार पडली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 18:36 IST2022-03-04T18:35:59+5:302022-03-04T18:36:38+5:30

जिल्ह्यातील ५८ हजार ३४३ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत.

12th std's offline paper after two years; 440 Exams centers in Aurangabad district | दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर; जिल्ह्यातील ४४० केंद्रांवर पार पडली परीक्षा

दोन वर्षांनंतर झाला बारावीचा ऑफलाईन पेपर; जिल्ह्यातील ४४० केंद्रांवर पार पडली परीक्षा

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर ऑफलाईन पद्धतीने दिला. दोन वर्षांच्या खंडानंतर विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिल्याने शैक्षणिक प्रवाह पुन्हा सुरु झाल्याचा चित्र दिसून आले. शाळा तेथे परीक्षांचे नियोजन असल्याने जिल्ह्यातील ४७० कनिष्ठ महाविद्यालये, शाळांपैकी १५३ मुख्य तर २८७ उपकेंद्रे अशा  ४४० परीक्षा केंद्रांवर आज परीक्षा पार पडली. 

जिल्ह्यातील ५८ हजार ३४३ विद्यार्थी परिक्षेला बसले आहेत. केंद्रावर विद्यार्थ्यांना तासभर आधी उपस्थित राहायच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. तर काही केंद्रांनी सकाळी ९ वाजता रिपोर्टिंग टाईम दिला होता. यामुळे सकाळी ९ वाजेपासूनच विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षा केंद्रांवर गर्दी केली. ऑनलाईन शिक्षण घेऊन दोन वर्षांच्या खंडानंतर ऑफलाईन पेपरला सामोरे जाताना काही विद्यार्थी साशंक वाटले. तर काही विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण दिसून आली. पहिलाच पेपर कंपल्सरी इंग्रजी भाषेचा असल्याने केंद्रांवर अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

जिल्ह्यात ७ जिल्हास्तरीय, ९ तालुकास्तरीय, समाजकल्याण, आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भरारी पथके तैनात आहेत. मुख्य केंद्रावर चार सदस्यीय आणि उपकेंद्रावर रनर यांनीच बैठ्या पथकाची भूमिका बजावली. परीक्षा तणावमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना दिल्या जात असताना काॅपीमुक्त परीक्षेबद्दल मात्र कोणीच बोलत नसल्याने काॅपीमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

केंद्र संचालक जबाबदार
गैरप्रकार होऊ नये ही तेथील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांची जबाबदारी आहे. शाळा तेथे परीक्षा होत असल्याने सर्वच शाळांना सूचना दिल्या. त्यानुसार तयारी पूर्ण झाली आहे. त्याच शाळेचे विद्यार्थी, पालक असल्याने गैरप्रकार, उपद्रवाचा प्रश्न निर्माण होणार नाही. गैरप्रकार आढळल्यास केंद्रप्रमुखांना बाहेरचे लोक होते, असे कारणही देता येणार नाही.
-एम. के. देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प. औरंगाबाद

Web Title: 12th std's offline paper after two years; 440 Exams centers in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.