औरंगाबाद जिल्ह्यात १०१ टक्के पाऊस; वार्षिक सरासरी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 19:44 IST2020-08-14T19:43:48+5:302020-08-14T19:44:20+5:30
जिल्ह्यातील केवळ सिल्लोड आणि सोयगाव वगळता सर्व तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात १०१ टक्के पाऊस; वार्षिक सरासरी ओलांडली
औरंगाबाद : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या पूर्वार्धातच १०१ टक्के पाऊस झाला. जिल्ह्याने वार्षिक सरासरी ओलांडली असून, सात तालुक्यांचा सरासरी पावसाचा कोटा पूर्ण झाला आहे.
जिल्ह्यातील केवळ सिल्लोड आणि सोयगाव वगळता सर्व तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. आठवडाभरात सिल्लोड आणि सोयगाव तालुकेही वार्षिक सरासरी पूर्ण करण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पावसाची सरासरी ५८४.२ मिलिमीटर आहे.
१३ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ४०१.३ मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असताना आजवर ४७१.९ मिलिमीटर पाऊस झाला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत १७२.८ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०१.१ टक्के हा पाऊस आहे. तालुक्यांचा विचार केला, तर सर्वाधिक १२४.४ टक्के पाऊस वैजापूर भागात झाला आहे. औरंगाबाद तालुक्यात १०१.१ टक्के, पैठण १०२.४, गंगापूर ११०.९, कन्नड १०८.८, खुलताबाद १०७.९, फुलंब्री तालुक्यात ११४ टक्के पाऊस झाला आहे. सिल्लोड तालुक्यात ७९.१, तर सोयगाव तालुक्यात ८३.५ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्यावर्षी १३ आॅगस्टपर्यंत ९८.८ टक्के पाऊस झाला होता.
वार्षिक सरासरीच्या तुलनेत पाऊस
तालुका टक्के
औरंगाबाद १०४.१
पैठण १०२.४
गंगापूर ११०.९
वैजापूर १२४.४
कन्नड १०८.८
खुलताबाद १०७.९
सिल्लोड ७९.१
सोयगाव ८३.५
फुलंब्री ११४.०
सरासरी १०१.१ टक्के
५ वर्षांतील १३ आॅगस्टपर्यंतचा पाऊस असा
तारेखपर्यंत पाऊस टक्केवारी
१३ आॅगस्ट २०१५ ४१.२७ टक्के
१३ आॅगस्ट २०१६ ५४.५८ टक्के
१३ आॅगस्ट २०१७ ३१.८९ टक्के
१३ आॅगस्ट २०१८ २६.२४ टक्के
१३ आॅगस्ट २०१९ ४६.२१ टक्के
१३ आॅगस्ट २०२० १०१.१ टक्के