देशभरात नवी १०० नर्सिंग महाविद्यालये सुरू करणार: जे. पी. नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:30 IST2025-04-28T15:25:43+5:302025-04-28T15:30:02+5:30
महाराष्ट्रास १० नवी वैद्यकीय महाविद्यालये देण्यात आली असून, त्यात आणखी एकाची भर पडत आहे.

देशभरात नवी १०० नर्सिंग महाविद्यालये सुरू करणार: जे. पी. नड्डा
छत्रपती संभाजीनगर : सरकारने कॅन्सरच्या उपचाराला प्राधान्यक्रम दिले आहे. वैद्यकीय शिक्षण असो की आरोग्य सेवा, निधीची कमतरता राहणार नाही. देशात १०० वैद्यकीय महाविद्यालयांसोबत नवे १०० नर्सिंग काॅलेज सुरू केले जातील. यात गोंदियात १९५ कोटी रुपयांच्या निधीतून आणि नंदूरबारमध्ये ३२५ कोटींतून हे काॅलेज स्थापित केले जातील. महाराष्ट्रास १० नवी वैद्यकीय महाविद्यालये देण्यात आली असून, त्यात आणखी एकाची भर पडत आहे. एमबीबीएसच्या ७०० जागा वाढल्या आहेत. नागपूर, मुंबईसह सहा ठिकाणी नवीन काॅलेजही दिले, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील (राज्य कर्करोग संस्था) ट्रू बीम युनिटचे आणि कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारित भागाचे रविवारी लोकार्पण नड्डा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. सतीश चव्हाण, आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, राज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ. कैलास शर्मा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांची उपस्थिती होती.
जे. पी. नड्डा म्हणाले, हे सरकार कॅन्सरच्या प्रतिबंधावर, स्क्रिनिंगवर व वार्धक्यशास्त्रावरही भर देत आहे. प्रत्येक जिल्ह्यात आगामी तीन वर्षांत ‘डे केअर सेंटर’ सुरू करण्याचे लक्ष्य आहे. यावर्षी २०० ‘डे केअर सेंटर’ सुरू करीत असून, त्यात महाराष्ट्रालाही प्राधान्यक्रम असेल. रुग्णालयाला दिलेल्या योगदानाबद्दल डाॅ. कैलाश शर्मा, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. अजय बोराळकर, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. अर्चना राठोड यांचा सत्कार करण्यात आला. डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी आभार मानले.
१०० खाटांवरून ३०० खाटांपर्यंत विस्तार
महाराष्ट्र शासनाचे पहिले आणि केवळ कर्करोग रुग्णांसाठी समर्पित शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी रविवारचा दिवस सोनेरी ठरला. कर्करोग रुग्णांसाठी २०१२ मध्ये १०० खाटांवर सुरू झालेल्या कर्करोग रुग्णालयाचा आता ३०० खाटांपर्यंत विस्तार झाला आहे.
स्वतंत्र जिल्हा रुग्णालये, आरोग्य सेवेचे नवीन मॉडेल करणार : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सरकारी व्यवस्थेत पहिल्यांदा ट्रू बीमची व्यवस्था छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली आहे. राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली असून, त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाच हजार कोटींचे कर्ज उभे केले आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रूपांतरित झाले आहेत, अशा जिल्ह्यात स्वतंत्र सामान्य रुग्णालय उभारू. पुढील तीन ते चार वर्षांत प्रत्येकाला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करू.
‘एम्स’च्या मागणीकडे दुर्लक्ष
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी नड्डा यांच्याकडे पुण्यासाठी नवीन ‘एम्स’ आणि छत्रपती संभाजीनगरला ‘एम्स’चा दर्जा देण्याची मागणी केली. परंतु, या मागणीकडे नड्डा यांनी दुर्लक्ष केले. देशात पूर्वी ६ एम्स होते. ही संख्या आता २२ झाल्याचे नड्डा म्हणाले.