घाटी रुग्णालयातील प्रसुती विभागात १०० खाटा, प्रत्यक्षात २५३ माता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:31 IST2022-05-11T17:30:43+5:302022-05-11T17:31:07+5:30
घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह अहमदनगर, जळगाव, धुळे इ. भागांतून रुग्ण दाखल होतात.

घाटी रुग्णालयातील प्रसुती विभागात १०० खाटा, प्रत्यक्षात २५३ माता
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील प्रसुती विभागात १०० खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात रोज २५३ माता प्रसुती विभागाच्या वाॅर्डात दाखल असतात. त्यामुळे जमिनीवर अंथरुण टाकून उपचार करण्याची करण्याची वेळ आली आहे.
घाटीत नुकतीच अभ्यागत समितीची बैठक पार पडली. या बैठकीत प्रसुती विभागाच्या अवस्थेवर चर्चा करण्यात आली. या ठिकाणी मराठवाड्यासह अहमदनगर, जळगाव, धुळे इ. भागांतून रुग्ण दाखल होतात. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतून सामान्य प्रसुतीसाठीही सरळ घाटीत आणण्याचा प्रकार होतो. त्यामुळे या विभागावर रुग्णसेवेचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, खाटाही अपुऱ्या पडतात. घाटीत माता आणि नवजात शिशुला एकाच छताखाली उपचार मिळावेत, यासाठी २०० खाटांचे स्वतंत्र माता व बाल विभाग (एमसीएच विंग) उभारण्यात येणार होते. त्यासाठी जागाही निश्चित झाली होती. मात्र दूध डेअरी येथील जागेत महिला व नवजात शिशु रुग्णालयाची उभारणी सुरू आहे. त्यामुळे घाटीतील एमसीएच विंग रद्द झाले. त्यामुळे प्रसुती विभागाची समस्या ‘जैसे थे’च आहे.
घाटीतील वर्षभरातील प्रसुतीची स्थिती
- एकूण प्रसुती - १७ हजार ६०७
- नैसर्गिक प्रसुती : १२ हजार ४७९ ( ७३.१६ टक्के)
- सिझेरियन प्रसुती : ४ हजार ३३७ (२५.४२ टक्के)
- इन्स्ट्रूमेंटल डिलिव्हरी- २४० (१.४० टक्के)