गॅस्ट्रोचे १० टक्के रुग्ण उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:40 IST2017-11-14T00:39:58+5:302017-11-14T00:40:01+5:30
छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या तब्बल २७०० वर पोहोचली आहे.

गॅस्ट्रोचे १० टक्के रुग्ण उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छावणी परिसरातील गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या तब्बल २७०० वर पोहोचली आहे. छावणी सामान्य रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही अनेकांना आराम मिळत नसल्याचे दिसते. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ अनेकांवर ओढावली. यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असताना परिस्थिती नियंत्रणात असल्याचाच दावा छावणी परिषदेच्या पदाधिका-यांकडून होत आहे.
छावणी परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने नागरिकांची छावणी सामान्य रुग्णालयात एकच गर्दी झाली. ही गर्दी काही कमी केल्या होत नसल्याचे दिसते. शनिवारी आणि रविवारी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी रुग्णांची संख्या कमी झाली; परंतु रुग्णालयात उपचारासाठी येण्याचा ओघ सुरूच राहिला. दिवसभरात दोनशे जणांवर उपचार करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत शेकडो नागरिकांनी उपचार घेतले; परंतु यातील अनेकांना अद्यापही आराम मिळालेला नाही. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात येण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. तीन दिवसांत उपचार घेतल्यांपैकी १० टक्के रुग्ण पुन्हा रुग्णालयात आल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली.
बाटलीबंद पाण्यावर भर
ड्रेनेजलाइन आणि जलवाहिनीचे पाणी एकत्र झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दूषित पाण्याच्या शक्यतेमुळे परिसरातील नागरिकांनी बाटलीबंद पाणी
घेण्यावर भर दिला आहे. आजारपणामुळे अनेकांचा रोजगारही बुडाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती
निर्माण झाल्याचे नागरिकांनी
म्हटले.