१ लाखाची सायकल ३ हजारांत विक्री; दोन जिवलग मित्रांचे ६ महिन्यांत सायकल चोरीचे शतक

By सुमित डोळे | Published: January 10, 2024 07:15 PM2024-01-10T19:15:43+5:302024-01-10T19:15:59+5:30

छत्रपती संभाजीनगरातून चोरायचे, वाळूजमधील कामगारांना विकायचे

1 lakh bicycle sold for 3 thousand; Two best friends steal a century of bicycles in 6 months | १ लाखाची सायकल ३ हजारांत विक्री; दोन जिवलग मित्रांचे ६ महिन्यांत सायकल चोरीचे शतक

१ लाखाची सायकल ३ हजारांत विक्री; दोन जिवलग मित्रांचे ६ महिन्यांत सायकल चोरीचे शतक

छत्रपती संभाजीनगर : वीटभट्टीवर मित्र झालेल्या दोन अल्पवयीन मुलांनी सहा महिन्यांमध्ये शहरातून तब्बल १०० पेक्षा अधिक सायकली चोरल्या. नशापाणीसाठी लाखाे रुपयांची सायकल अवघ्या ३ ते ४ हजारांत विकली. वाळूजमधील कामगार वर्ग स्वस्त सायकलीच्या आमिषाला बळी पडला. जवाहरनगर पोलिसांनी या चोरांना रंगेहाथ पकडत त्यांनी चोरलेल्या तब्बल ६३ सायकलींचा शोध लावला. त्यानंतर दोघांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.

गेल्या काही दिवसांमध्ये उस्मानपुरा, जवाहरनगर व सातारा परिसरात सायकल चोरीचे सत्र वाढले होते. त्या अनुषंगाने जवाहरनगरचे निरीक्षक व्यकंटेश केंद्रे यांच्या सूचनेवरून सहायक निरीक्षक दिलीप चंदन चोरांच्या शोधात होते. एका घटनेचे त्यांना स्पष्ट सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. पथकातील पोलिस नाईक मनोहर पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून इंदिरानगरमध्ये त्याच वर्णनाची मुले फिरत असल्याची माहिती मिळाली. चंदन, सहायक फौजदार गजेंद्र शिंगाणे, शोन पवार, संदीप क्षीरसागर, जावेद पठाण, राजेश चव्हाण, श्रीकांत काळे, बाळासाहेब बैरागी, ज्ञानेश्वर शेलार, विजय सुरे यांनी साध्या वेशात सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले. उपायुक्त नवनीत काँवत, सहायक आयुक्त रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

दोघांनी सहा महिन्यांपासून सायकल चोरी सुरू केली होती. शहरातून सायकल चोरून ते वाळूजमधील कामगारांना विकायचे. स्वस्तात सायकल भेटत गेल्याने कामगारही आमिषाला बळी पडत गेले. अशा १०० पेक्षा अधिक सायकली त्यांनी चोरल्या. त्यापैकी पथकाने तीन दिवसांत ६३ सायकलींचा शोध लावला.

१ लाखाची सायकल ३ हजारांत विक्री
-एक १६ वर्षीय चोर वाळूजमध्ये राहतो. त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करतात, तर १५ वर्षांचा एक जण रमानगरमध्ये राहतो. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, आई धुणी-भांडी करते. ते पूर्वी वाळूजमध्ये राहत असताना त्यांची मैत्री झाली होती.
-दोघांनी चोरलेल्या सायकली या अत्यंत महागड्या, आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या आहेत. १ लाख २० हजारांची एक सायकल त्यांनी अवघ्या ३ हजारांत विकली. उस्मानपुऱ्यातून चोरलेली ७० हजारांची सायकल अडीच हजारात सुरक्षारक्षकाला विकली.

Web Title: 1 lakh bicycle sold for 3 thousand; Two best friends steal a century of bicycles in 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.