धनराज रामटेके लोकमत न्यूज नेटवर्कमूल : तालुक्यातील ३० गावांचा मागील दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने महिलांना ऐन उन्हात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र, संबधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.
मूल तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी शासनाने मूल २४ गाव ग्रीड पाणीपुरवठा योजना, बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, टेकाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व बोरचांदली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंमलात आणली. या योजनेची वीज देयके भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाची असतानाही सदर योजना पंचायत समिती स्तरावर चालवावी, असा आदेश पारित केला. ग्रा.प. कडेही स्वउत्पन्न पुरेसे नाही.
२४ गावग्रीड योजनेचे ४० लाख ४३ हजार ९४० रुपये, बेंबाळ प्रादेशिक योजना १३ लाख २५ हजार ७५० रुपये, बोरचांदली प्रादेशिक योजना १२ लाख ३ हजार सहाशे व टेकाडी प्रादेशिक योजना ५ लक्ष रुपये थकीत आहे.
वीज पुरवठा खंडितदेयके थकित असल्याने महावितरणने पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला होता. आता महिलांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सरपंचांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
"मागील दोन महिन्यांपासून २४ गाव ग्रीड योजनेचा पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. जि. प. प्रशासनाने सहकार्य करून तोडगा काढावा व पाणीपुरवठा योजना सुरू करावी."- दर्शना किन्नाके, सरपंच, ग्रामपंचायत, जानाळा