वेडगाव हादरले..! कुऱ्हाडीने वार करून पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पती फरार, घटनास्थळी चंद्रपूर पोलिस अधीक्षक दाखल
By राजेश भोजेकर | Updated: February 16, 2024 12:55 IST2024-02-16T12:52:44+5:302024-02-16T12:55:48+5:30
माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव या गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

वेडगाव हादरले..! कुऱ्हाडीने वार करून पत्नीची निर्घृण हत्या; आरोपी पती फरार, घटनास्थळी चंद्रपूर पोलिस अधीक्षक दाखल
चंद्रपूर : माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव या गावात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. आयुष्याची जोडीदार पत्नी झोपेत असताना कुऱ्हाडीने सपासप वार करून अत्यंत क्रूरपणे तिची निर्घृण हत्या करून आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण वेडगाव परिसर हादरला असून घटनास्थळी चंद्रपूर पोलिस अधीक्षक तात्काळ दाखल झाले आहेत.
सविस्तर वृत्तानुसार, मृतक पत्नी लताबाई दामोधर येलमुले (वय ३६) ही घरी झोपली होती. मुलगा निखिल दामोधर येलमुले (वय २२) व अखिल दामोधर येलमुले (वय २०) हे रात्रपाळीला कापूस भरण्याकरीता दुसऱ्याच्या घरी गेले होते.त्याच मध्यरात्री आरोपी पती दामोधर मारोती धुडसे (वय ४०) मुले घरी नसल्याची संधी साधून मृतक पत्नीला कुऱ्हाडीच्या साहाय्याने अत्यंत क्रूरपणे अंथरुणावरच सपासप वार करून ठार केले.
जेव्हा मोठा मुलगा निखिल रात्री ३ वाजताच्या सुमारास घरी आला तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडलेली दिसताच त्याने आरडाओरडा केला त्याच क्षणी आरोपी वडील घटनास्थळावरून पसार झाला.वृत्त लिहीपर्यंत पत्नीला ठार मारण्याचे कारण कळाले नसून पंचनामा करून गोंडपिपरी येथे शवविच्छेदन करण्याकरीता पाठविण्यात आले.त्यावेळी चंद्रपूर पोलिस अधीक्षक सह लाठी,धाबा,विरुर येथील ठाणेदार,पोलिस कर्मचारी हजर असून पुढील तपास चालू आहे.