शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबजदार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:34 IST2021-09-10T04:34:59+5:302021-09-10T04:34:59+5:30
चंद्रपूर : शहर स्वच्छ, सुंदर तसेच नीटनेटके ठेवण्याची प्रत्येक नागरिकांसह महापालिकेचीही जबाबदारी आहे. मात्र नागरिकांसह महापालिका याकडे दुर्लक्ष करीत ...

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबजदार कोण?
चंद्रपूर : शहर स्वच्छ, सुंदर तसेच नीटनेटके ठेवण्याची प्रत्येक नागरिकांसह महापालिकेचीही जबाबदारी आहे. मात्र नागरिकांसह महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. जनजागृतीचे अनधिकृत होर्डिंग्ज शहरातील विविध भागात लावून महापालिका प्रशासन मोकळे होत आहे. शहराचे विद्रुपीकरण होणाऱ्या होर्डिंग्ज लावण्यासंदर्भात न्यायालयाचे आदेश आहे. मात्र सातत्याने नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
चंद्रपूर शहरातील विविध चौकात फेरफटका मारला तर जागोजागी असे होर्डिंग्ज लावण्यात आल्याचे बघायला मिळते. वीज खांब तर अनधिकृत होर्डिंग्जची हक्काची जागा अशीच काहीशी अवस्था शहरात आहे. महापालिका प्रशासनाची या होर्डिंग्जला मूकसंमती तर नाही ना, अशी शंकाही सामान्य नागरिकांना येणे स्वाभाविकच आहे.
बाॅक्स
या ठिकाणाकडे लक्ष कोण देणार ?
शहरातील विविध ठिकाणी अवैध होर्डिंग्ज लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. यामध्ये वरोरा नाका पूल, इंदिरा गांधी चौक, कस्तुरबा चौक, गांधी चौक, जटपुरा गेट परिसर, छोटा बाजार चौक, बंगाली कॅम्प, बागला चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.
बाॅक्स
मनपाही अवैध होर्डिंग्जमध्ये पुढे
शहराचे विद्रुपीकरणासाठी ज्या प्रमाणे काही नेते मंडळीसह नागरिक जबाबदार आहे त्याच प्रमाणे महापालिका पदाधिकारी तसेच प्रशासनही जबाबदार आहे. विविध ठिकाणी होर्डिंग्ज लावून मनपा नागरिकांमध्ये जनजागृती करीत असली तरी लावण्यात आलेले होर्डिंग्ज कुठे लावायचे याचे भान मनपालाही नसल्याचे शहरात फिरल्यानंतर दिसून येते.
बाॅक्स
कार्यवाही नाही
अनधिकृत होर्डिंग्जबाबत काही महिन्यापूर्वी महापालिकेत बैठक झाली. यामध्ये होर्डिंग्ज हटविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले. मात्र त्यापुढे काहीच झाले नसल्याचे समजते.
बाॅख्स
वीज खांब हक्काची जागा
शहरातील बहुतांश वीज खांबावर अवैध होर्डिंग्ज लावण्यात आले असून यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.