काय सांगता? चंद्रपूर जिल्ह्यातील 'त्या' गावात दररोज घरोघरी बनत होती बासुंदी
By साईनाथ कुचनकार | Updated: July 19, 2022 21:59 IST2022-07-19T21:54:45+5:302022-07-19T21:59:33+5:30
Chandrapur News कोणतेही निमित्त वा सण नसताना चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात दररोज बासुंदी तयार केली जातेय.

काय सांगता? चंद्रपूर जिल्ह्यातील 'त्या' गावात दररोज घरोघरी बनत होती बासुंदी
साईनाथ कुचनकार
चंद्रपूरः दिवाळी, दसरा किंवा मोठे सण असले तर बहुतांश कुटुंबीय गोडधोड पदार्थ तयार करतात. मात्र कोणताही सण नसताना, कोणतेही निमित्त नसूनही एका गावातील बहुतांश घरी बासुंदी तयार करण्यात आली असे सांगितले तर नवल वाटेल. ही नवलाईची घटना मागच्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यातील पिपरी देशमुख या गावात घडली. मात्र सध्या हे गाव मात्र पुराच्या पाण्याने वेढलेले असून येथील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे.
मागील दहा दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. यामुळे अनेक मार्ग बंद आहे. भद्रावतीतील पिपरी देशमुख हे गाव दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र शहरात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने शेकडो लीटर दुधाचे काय करायचे, हा प्रश्न अनेकांना पडला. त्यावर उपाय म्हणून अनेकांनी आपल्या घरी बासुंदी तयार केली. एवढेच नाही तर ती गावातही वाटून दिली. घरोघरी तयार झालेल्या या बासुंदीवर गावकऱ्यांनी ताव मारला. बाकी काही असो, बासुंदीच्या या सामुहिक मेजवानीमुळे मात्र गावासह परिसरातही हा विषय चर्चेचा ठरला होता.
गेल्या आठवड्यात बासुंदीचा आस्वाद घेणारे हे गावकरी या आठवड्यात मात्र पुराच्या पाण्याने वेढले असून, येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे.