Waghdoh Tiger : ताडोबाची शान असलेल्या 'वाघडोह' वाघाचा मृत्यू; वन्यप्रेमी हळहळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 15:00 IST2022-05-23T14:24:24+5:302022-05-23T15:00:57+5:30
आज सकाळी सिनाळा जंगलात त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Waghdoh Tiger : ताडोबाची शान असलेल्या 'वाघडोह' वाघाचा मृत्यू; वन्यप्रेमी हळहळले
चंद्रपूर : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. वाघडोह असे त्याचे नाव. हा वाघ ताडोबातील वाघडोह भागात दीर्घकाळ राहिल्याने त्याला 'वाघडोह मेल' हे नाव पडले.
कधीकाळी ताडोबात वाघडोह वाघाचा दरारा होता, पण कालांतराने वृद्धावस्थेमुळे त्याचे वर्चस्व कमी होत गेले व इतर वाघांनी त्याला हुसकावून लावले. तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रानजीक असलेल्या जंगलात भटकत होता.
काही दिवसांपूर्वी या वाघाचे जर्जर अवस्थेतील फोटो व्हायरल झाले होते. वय वाढल्यामुळे त्याला शिकार करणे अवघड झाले होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती. अशातच आज सकाळी सिनाळा जंगलात त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या वयोवृद्ध वाघाचं वय १७ वर्षे इतकं होतं. एवढा जास्त काळ जगलेला १७ वर्षे वयाचा हा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचंही सांगितलं जात आहे.